Shraddha at Gaya Tirth Dham : पितृपक्षात सर्वपित्री अमावस्येला श्राद्धाचं विशेष महत्त्व आहे. सर्वपित्री अमावस्येला 'महालया श्राद्ध' असेही म्हणतात. त्र्यंबकेश्वर नाशिक, महाकालेश्वर उज्जैन, गंगा, प्रयाग, पुष्कर, अमरकण्टक आणि इतर काही ठिकाणी श्राद्धकर्म संपन्न होतात. पंरतु बिहारमधील फल्गु नदीच्या तीरावर असलेल्या गया तीर्थाला श्राद्धकर्मासाठी महातीर्थ म्हणून मान्यता आहे. गया पितरांच्या उद्धारासाठी सर्वश्रेष्ठ स्थान आहे.
शास्त्रात केवळ मानवांसाठी तीन प्रकारचे ऋण सांगितले आहेत. देवऋण, ऋषीऋण आणि पितरांचे ऋण... यात पितरांचे ऋण श्राद्धाने फेडले जातात. पूर्वजांप्रती आदरभाव आणि श्रद्धेने जे कर्म केले जाते ते ‘श्राद्ध’. ज्यामध्ये पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी पिंडदान तर्पण श्राद्ध केले जातात. या काळात सर्व पूर्वज पिंडदान किंवा तर्पण घेण्यासाठी गया या तीर्थक्षेत्री येतात.
गया तीर्थ हे भगवान सूर्याचे ज्येष्ठ नातू सुघुम्न याचा पुत्र 'गय' याने वसवले होते. या तीर्थक्षेत्रात त्यांनी शंभर 'अश्वमेध यज्ञ' केले. या यज्ञाच्या पुण्यप्रतापाने या तीर्थ क्षेत्राचे नाव 'गया' म्हणून प्रसिद्ध झाले. त्याचबरोबर दुसर्या वायुपुराणातील कथेनुसार प्राचीन काळी 'गयासुर' नावाचा एक राक्षस होता. त्याने आपल्या तपश्चर्येने सर्व देवतांना वश केले आणि आपल्या ताब्यात घेतले होते. सर्व देवतांनी त्याच्यापासून रक्षणासाठी प्रथम भगवान विष्णूची प्रार्थना केली. विष्णूंनी ब्रह्माजींना महाकाय शरीर असणाऱ्या गयासुराकडे पाठवले. तपश्चर्येच्या प्रभावाने गयासुराचे शरीर महाकाय आणि पवित्र झाले होते.
यज्ञ संपन्न करण्याच्या निमित्ताने ब्रह्माजी आले आणि गयासुरला भेटले. गयासुराला त्याचे शुद्ध शरीर यज्ञासाठी मागितल्यावर त्याने ते त्यांना आनंदाने दिले. प्रचंड महाकाय शरीर असलेला गयासुर जमिनीवर उत्तरेकडे डोके व दक्षिणेकडे पाय ठेवून झोपला. त्यानंतर त्यांच्या अंगावर यज्ञाचा विधी पार पडत असताना त्याचे शरीर स्थिर राहू शकले नाही. ब्रह्मदेवाने थोडा वेळ शांततेसाठी प्रार्थना केली. परंतु महाकाय मयायुर शांत होऊ शकला नाही. हे पाहून सर्व तीर्थराज आणि देवी देवतेने भगवान विष्णूंना आवाहन केले. गदाधारी भगवान विष्णू हे लगेच त्या जागेवर पोहोचले आणि गयासुराच्या शरीरावर पाय ठेवला. त्यानंतर गयासुर स्थिर झाला. गयासुराने भगवान विष्णुकडून आश्वासन घेतले आणि भगवान विष्णूने गयासुराला आश्वस्त केले की, जे मनुष्य या तीर्थस्थळावर येऊन आपल्या पूर्वजांचे पितरांचे श्राद्ध करतील. त्यांच्या २१ कुळांचा उद्धार होईल. तेव्हापासून हे ठिकाण 'गया' या नावाने प्रसिद्ध झाले.
गयातीर्थ येथे प्रभाशेखर, कोटिखल, स्वर्गद्वारेश्वर, रामेश्वर, गदालोल, ब्रह्मेश्वर, महाचंडी, मार्कण्डेश्वर इत्यादी प्रसिद्ध मंदिर आहेत. भक्त फाल्गुन नदी, ब्रह्मतीर्थ, सोमतीर्थ, रामहृदा आणि वैतरणी सारख्या ठिकाणी स्नान करतात. भस्मकूट, गायत्री, सावित्री आणि सरस्वतील या ठिकाणी तर्पण करण्याचा नियम आहे. धर्मारण्य, मंगलवापी, धर्मकुप, धेनुकर्ण्य, भारताश्रम, पांडुशीला आणि कौशिकी या ठिकाणी श्राद्ध केले जाते. याचसोबत विष्णुपद, अक्षयवत, गया तसेच गडोल, रामशिला, प्रेतशिला, रामकुंड आणि ब्रह्मकुंडला भेट देतात. या ठिकांणानाही खूप धार्मिक महत्त्व आहे.
भगवान बुद्धांना ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झाली ते स्थान देखील येथेच आहे. ज्याला 'बोध गया' म्हणून ओळखले जाते. विशेषतः सर्वपित्री अमावास्येला गया येथे मृत आत्म्यासाठी तर्पण श्राद्ध पिंडदान केल्याने त्यांना मोक्ष आणि पुण्य फल प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे.
संबंधित बातम्या