पोर्तुगीजांनी पाडलं, मात्र शिवरायांनी बांधलं, अशी ज्या मंदिराची ओळख आहे, ते गोव्याचं प्रसिद्ध सप्तकोटीश्वर मंदिर पुन्हा एकदा जिर्णोद्धारानंतर आजरासून भाविकांसाठी खुलं करण्यात येणार आहे. १२ व्या शतकात कदंब राजाने आपली पत्नी कमलादेवी यांच्यासाठी हे मंदिर बांधलं होतं. कालांतराने इथं ख्रिश्चन आणि पोर्तुगीजांनी राज्य केलं. मात्र या देवळातलं शिवलिंग कसंबसं ग्रामस्थांनी वाचवलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कानी मोरोपंतांनी ही बातमी घातल्यावर शिवरायांनी, ‘माझा देव इथं भिजतो आहे आणि आम्ही हे पाहातो आहे’, असे उदगार काढत या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचं फर्मान सोडलं.
१६६४ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. आता पु्न्हा एकदा सप्तकोटीश्वर मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून या मंदिराचं हे रुपडे विलोभनीय आहे. गोकुळाष्टमी हा सण या मंदिरात साजरा केला जाणारा सर्वात प्रमुख सण आहे जो स्थानिक लोक तसेच विविध भागांतील पर्यटक मोठ्या थाटामाटात साजरा करतात.
या जीर्णोद्धाराचे काम मुंबईतील वास्तुसल्लागार राहुल चेंबुरकर यांच्या मार्गदर्शनात पूर्ण झाले. गोव्याचं 'राज दैवत' असलेल्या श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे आज लोकार्पण पार पडलं आणि तेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते. तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही या सोहळ्याला उपस्थित होते.
सप्तकोटेश्वराच्या शिवलिंगाचा अभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातल्या गडांवरील पाण्याने केला गेला. सप्तकोटेश्वर देवस्थानाचा लोकार्पण सोहळा हा गोव्यातला एक ऐतिहासिक प्रसंग असून त्याचा एक भाग होण्याचं मला भाग्य लाभलं आहे असं गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणलेत.