Saphala Ekadashi Katha : सफला एकादशी व्रताचे खास महत्त्व, वाचा या एकादशीची व्रत कथा
मराठी बातम्या  /  धर्म  /  Saphala Ekadashi Katha : सफला एकादशी व्रताचे खास महत्त्व, वाचा या एकादशीची व्रत कथा

Saphala Ekadashi Katha : सफला एकादशी व्रताचे खास महत्त्व, वाचा या एकादशीची व्रत कथा

Published Dec 26, 2024 09:03 AM IST

Saphala Ekadashi Vrat Katha In Marathi : यंदा आज २६ डिसेंबरला सफला एकादशी आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला सफला एकादशी म्हणून ओळखले जाते. या वर्षातील ही शेवटची एकादशी असून, वाचा सफला एकादशी व्रत कथा.

सफला एकादशी व्रत कथा
सफला एकादशी व्रत कथा

Saphala Ekadashi Story In Marathi : यावर्षी सफला एकादशी २६ डिसेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला सफला एकादशी म्हणून ओळखले जाते. या दिवशी तुम्हाला जे काही काम हवं असतं, ते काम पूर्ण होतं, असं म्हटलं जातं. या दिवशी सकाळी उपवास करण्याचा संकल्प करा आणि नंतर आपले कार्य पूर्ण व्हावे अशी कामना करा.

सफला एकादशी तिथी प्रारंभ आणि समाप्ती आणि शुभ योग मुहूर्त -

बुधवार २५ डिसेंबर रोजी रात्री १० वाजून ३० मिनिटांनी एकादशी सुरू होईल, जी २६ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजून ४५ मिनिटापर्यंत राहील. स्वाती नक्षत्र २५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजून २२ मिनिटांपासून ते २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांपर्यंत असेल. उदया तिथीनुसार २६ डिसेंबर रोजी एकादशी तिथी व्रत केले जात असून, द्वादशी तिथीला एकादशीचे व्रताचे पारण करणे लाभदायक ठरते.

सफला एकादशी व्रत कथा -

सफला एकादशी व्रत कथेच्या कथेनुसार चंपावती नगरीत महिष्मत नावाच्या राजाचे पाच पुत्र होते. मोठा मुलगा चारित्र्यहीन होता आणि देवांचा तिरस्कार करत असे. त्याने मांसही खाल्ले आणि त्यासोबतच अनेक अनिष्ट गोष्टी केल्या, ज्यामुळे राजा व त्याच्या भावांनी त्याचे नाव लुम्पक ठेवले, त्यानंतर त्याच्या भावांनी त्याला राज्यातून हाकलून दिले. असे होऊनही तो स्वस्त बसला नाही आणि त्याने स्वत:चेच शहर लुटले. एके दिवशी तो चोरी करत असताना सैनिकांनी त्याला पकडले, पण राजाचा मुलगा म्हणून त्याची सुटका झाली. मग तो जंगलात एका पिंपळाच्या झाडाखाली राहू लागला. मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील दशमीच्या दिवशी थंडीमुळे तो अत्यंत अशक्त झाला, अन्न आणण्याची शक्तीही त्याच्यात नव्हती.

दिवस उजाडता- उजाडता तो मूर्छित झाला. दुसर्‍या दिवशी सूर्योदय झाल्यानंतर सूर्याच्या गर्मीमुळे त्याला जाग आली. कसाबसा स्वत:ला सावरत तो काही खायला मिळते का, हे पाहण्यासाठी फिरू लागला. पशुपक्ष्यांची शिकार करण्याइतकी शक्तीही त्याच्या अंगात राहिली नव्हती. त्यामुळे ज्या ठिकाणी झाडांची जमिनीवर पडलेली फळे दिसली. तो गोळा करून तो त्याच पिंपळाच्या झाडाखाली आला. तोपर्यंत सूर्य मावळतीला आला होता. तेव्हा आणलेली फळे त्याने झाडाच्या खाली ठेवली आणि परमेश्‍वरला प्रार्थना करून ती अर्पण केली. त्याच्या या उपवास आणि जागरणामुळे भगवान प्रसन्न झाले आणि त्याचे सर्व पाप नष्ट झाले.

तेव्हा त्याला सफला एकादशीच्या प्रभावाने राज्य आणि पुत्राचे वरदान मिळाले. यामुळे लुंभकचे मन चांगल्याकडे झुकले आणि मग त्याच्या वडिलांनी त्याला राज्य दिले. त्याला मनोग्या नावाचा पुत्र झाला, त्यानंतर त्याने त्याला राज्य सोपवले आणि स्वतः लुंभक विष्णू भजनात गुंतून मोक्ष प्राप्त करू शकला.

या सफला एकादशीचे व्रत केल्याने, व्रत कथा वाचल्याने मनुष्याला अश्‍वमेध यज्ञाचे फळ मिळते असे सांगितले जाते.

 

Whats_app_banner