आषाढ महिना सुरू झाला की सर्व वारकऱ्यांना वेध लागतात ते आषाढी एकादशीचे, कारण यानिमित्त सर्व वारकरी पंढरपूराला जमतात. महाराष्ट्रात पंढरपूर यात्रेला फार महत्व आहे आणि या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे वारकऱ्यांची पायी वारी होय. बुधवार १७ जुलैला ही मोठी एकादशी असून, पालखी प्रस्थान सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. शुक्रवार २८ जून रोजी संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान होईल.
हिंदू धर्मामध्ये विशेष करुन वारकरी सांप्रदायात फाल्गुन कृष्ण पक्षातील द्वितीया तिथीला अनन्यसाधारण महत्व आहे. मान्यतेनुसार याच दिवशी संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्रात यादिवशी 'तुकारामबीज' साजरी केली जाते. संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी वैकुंठ यात्रा ज्या ठिकाणाहून सुरु केली होती ते ठिकाण म्हणजे देहू होय.
आजही लाखो भाविक याठिकाणाला भेट देण्यासाठी येतात. विशेष म्हणजे तुकाराम महाराजांच्या या यात्रेदरम्यान एक नांदुरकी वृक्षाचा देखील उल्लेख आवर्जून केला जातो आणि आजही तुकारामबीज दिवशी त्याठिकाणी असे काही घडते ज्याचे सर्वांनाच आश्चर्य वाटते. त्याशिवाय असे सांगितले जाते की, संत तुकारामांनी आपल्या वैकुंठ वासातील प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याचे वर्णन लिहून ठेवले होते.
अध्यात्मिक माहितीनुसार, संत तुकाराम महाराजांचा जन्म देहू याठिकाणी झाला होता. संत तुकाराम महाराजांच्या पावन स्पर्शाने या भूमीला अध्यात्मिक महत्व प्राप्त आहे. तुकाराम महाराज याच गावातून वैकुंठास गेले होते. देहूमध्ये तुकाराम महाराजांच्या आयुष्याशी संबंधित घटनांवर आधारित अनेक मंदिरे आहेत. तुकाराम महाराजांचा जन्म ज्याठिकाणी झाला त्याठिकाणी एक मंदिर आहे.
शिवाय याठिकाणी गाथा मंदिरसुद्धा आहे. तुकाराम महाराजांच्या गाथा तरुन वर आल्या त्याठिकाणी असलेल्या मंदिरालाच गाथा मंदिर संबोधले जाते. संत तुकाराम महाराज ज्याठिकाणाहून वैकुंठास गेले त्याठिकाणच्या मंदिरात एक मोठा वृक्ष आहे. त्या वृक्षाचेच 'नांदुरकी' वृक्ष असे नाव आहे. तुकाराम महाराज देह ठेवण्यापूर्वी याच वृक्षाच्या छायेखाली विसावले होते. यावेळी संपूर्ण गाव आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यसुद्धा तिथे हजर होते.
संत शिरोमणी तुकाराम महाराज ज्यावेळी शेवटच्या प्रवासाला मार्गस्थ झाले. त्यावेळी दुपारी १२ वाजून २ मिनिटांच्या सुमारास विष्णुतत्व अवतरले आणि त्यांनी तुकाराम महाराजांना एकरुप करुन घेतलं. ही अध्यात्मिक घटना सर्वांसमोर घडली असे सांगितले जाते. त्यावेळी विष्णूतत्व तुकारामांसोबत त्या वृक्षात विलीन झाले. यानंतर सर्वच लोक त्या वृक्षासमोर नतमस्तक झाले होते. तेव्हापासून आजतागायत तुकाराम बीजेला त्याच वेळेला म्हणजे १२ वाजून २ मिनिटांनी नांदुरकी वृक्ष हालतो आणि क्षण फारच चमत्कारिक भासतो. आजही भाविक त्याठिकाणी जाऊन या घटनेचे साक्षीदार बनतात.