Ashadhi Wari : संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान; कुठे व कधी होणार रिंगण? वाचा संपूर्ण वेळापत्रक
मराठी बातम्या  /  धर्म  /  Ashadhi Wari : संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान; कुठे व कधी होणार रिंगण? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Ashadhi Wari : संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान; कुठे व कधी होणार रिंगण? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Jun 27, 2024 05:34 PM IST

Ashadhi Wari Palkhi Sohala 2024 : आषाढ महिना लागायच्या आधीच सर्व संताच्या पालख्यांच्या प्रस्थानाची लगबग सुरू होते. वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. जाणून घ्या संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचे वेळापत्रक.

संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा २०२४
संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा २०२४

पंढरपूरची यात्रा, संताचा पालखी सोहळा आणि पायी जाणारे वारकरी हे परंपरा लाभलेले महाराष्ट्रातील एक आकर्षणच आहे. आषाढी वारी च्या निमित्ताने वारकरी मंडळी हळूहळू विठू नामाचा गजर करत मजल दर मजल करत पंढरपूरच्या दिशेने प्रवास करतात. पायी वारी करण्याचा अनुभव अदभूत असतो.

ज्ञानोबा, तुकोबांसह अनेक संतांच्या पालख्या आषाढी वारी निमित्त पंढरपूरच्या दिशेने प्रवास करत असतात. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची दिंडी हजारो दिंड्यांसह पंढरपूरला येतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिंड्या वाखरी गावातील संतनगरी या ठिकाणी एकत्र येतात. या सर्व दिंड्या आषाढ शुध्द दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात, त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आणि आपापल्या दिंड्या हळूहळू पंढरपूरकडे निघतात.

एकादशीच्या दिवशी या सर्व संताच्या वारी पंढरपूरला पोहोचल्यानंतर ते चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरी चा जयघोष संपूर्ण पंढरपूरमध्ये घुमतो. हा संपूर्ण उत्सव आषाढ शुध्द पौर्णिमेच्या दिवशी संपतो ज्याला गोपालकाला असेही म्हणतात.

दरवर्षीप्रमाणेच यंदाच्या वारीला पंढरपूरकडे मोठ्या संख्येने वारकरी आणि इतर भाविकांची गर्दी होणार आहे. दरम्यान, तुम्ही वेळापत्रक पाहून पालखी कुठे आहे हे पाहू शकता.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे हे यंदाचे ३३९ वे वर्ष आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान शुक्रवार २८ जून रोजी देहूतील इनामदार साहेब वाडा येथून होईल.शनिवार २९ जून रोजी ही पालखी चिंचोली निगडी मार्गे आकुर्डीतील श्री विठ्ठल मंदिरात पोहोचेल इथे पालखीचा पहिला मुक्काम असेल.रविवार ३० जून रोजी पिंपरी कासारवाडी मार्गे पुण्यात दाखल होईल. १ जून पर्यंत तुकोबाच्या पालखीचा मुक्काम पुण्यातील नानापेठेतील श्री निवडूंग विठ्ठल मंदिरात राहील. २ जुलै रोजी पालखी पुण्याहून लोणी काळभोर मार्गे कदम चाक वस्ती येथे मुक्कामाला थांबेल. ३ जुलै रोजी यवत येथील भैरवनाथ मंदिरात पालखी असेल. 

गुरुवार ४ जुलै रोजी वरवंड येथील विठ्ठल मंदिरात तर ५ जुलै रोजी उंडवडी येथे पालखीचा मुक्काम राहील. ६ जुलै रोजी बारामती शारदा विद्यालयाच्या प्रांगणात पालखीचा मुक्काम असेल. ८ जुलै रोजी सणसर बेलवाडी येथे मुक्काम राहील. ९ जुलै रोजी रात्री अंथुर्णे येथे पालखी मुक्कामाला थांबेल. १० जुलै रोजी निमगाव केतकी येथे पालखीचा मुक्काम राहील. १२ जुलै रोजी सकाळी सराटी येथे निरा स्नान करून पालखी अकलूजकडे रवाना होईल. १३ जुलै रोजी माळीनगर मार्गे जाईल आणि बोरगाव येथे मुक्काम राहील. १४ जुलै रोजी तोंडले बोंडाळे मार्गे पिराची कुरोली येथे मुक्काम असेल. १६ जुलै रोजी बाखरी येथून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करेल.

रिंगण सोहळा

तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात गोल रिंगण ८ जुलैला बेलवाडी, १० जुलैला इंदापूर, १२ जुलैला अकलूज, माने विद्यालय मध्ये होणार आहे. तर उभे रिंगण १३ जुलैला माळीनगर, १५ जुलैला बाजीराव विहीर, १६ जुलैला पंढरपूरला होणार आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान शनिवार २९ जून रोजी आळंदी येथून होईल. माऊलींचा पहिला मुक्काम आळंदी येथेच दर्शन मंडप इमारत गांधीवाडा येथे असेल. ३० जून रोजी आळंदीहून पुण्याच्या दिशेनं पालखी मार्गस्थ होईल. १५ जुलैला पालखी वाखरीला पोहचणार आहे. तर १६ जुलैला वाखरी ते पंढरपूर असा प्रवास होईल. १७ जुलै रोजी मुख्य आषाढी एकादशी पंढरपूर यात्रेचा सोहळा असणार आहे. २० जुलैपर्यंत माऊलींची पालखी पंढरपूर नगरीत राहील. २१ जुलै रोजी परतीच्या प्रवासासाठी आळंदीकडे निघणार आहे.

रिंगण सोहळा

पहिले उभे रिंगण ८ जुलै चांडोबाचा लिंब येथे होईल. पहिले गोल रिंगण १२ जुलै पुरंद वडेला, दुसरे गोल रिंगण १३ जुलै खुडुस फाटा येथे होईल तर तिसरे गोल रिंगण १४ जुलै ठाकूर बुवाची समाधी येथे होईल. दुसरे उभे रिंगण १५ जुलै बाजीरावाची विहीर येथे, चौथे गोल रिंगण १५ जुलै बाजीरावाची विहीर येथे तिसरे उभे रिंगण १६ जुलै वाखरी येथे पार पडेल. इथेच पादुका आरतीही होईल.

Whats_app_banner