Santaji Jagnade Maharaj Jayanti: संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सुदुंब्रे या गावी झाला. विठोबा जगनाडे हे महाराजांचे वडील होत. विठोबा जगनाडे आणि आई मथाबाई हे विठ्ठलभक्त होते. यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले.
१७ व्या शतकात महाराष्ट्रात कीर्तनाच्या माध्यमातून त्या काळचे संत आपल्या समाजाचे प्रबोधन करण्याचे काम करत होते. संतांच्या अभंगाचे समजावर गारूड होते. तेव्हा संत तुकाराम महाराज यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेली होती. एकदा संत तुकाराम महाराज संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते. त्यांची कीर्तने ऐकून संताजींच्या मनावर तुकारामांचा मोठा प्रभाव पडला. तेव्हा त्यांनी संसार सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, संसारात राहून परमार्थ साधता येतो, असे संत तुकाराम महाराजांनी संताजींना सांगितले. तेव्हापासून संताजी महाराज हे संत तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यांमध्ये सहभागी झाले.
संत संताजी जगनाडे महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या सावलीत राहून त्यांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली. संत तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडविण्यात आल्या. मात्र, तुकोबारायांचे सर्व अभंग हे संताजी महाराजांना तोंडपाठ होते. ते त्यांनी पुन्हा लिहून काढले.
मृत्यूनंतर शेवटच्या क्षणी तुमच्या पार्थिवावर माती टाकण्यासाठी येणार असे वचन संत तुकाराम महाराजांनी संत जगनाडे महाराजांना दिले होते असे म्हटले जाते. मात्र, तुकाराम महाराज हे जगनाडे महाराजांच्या अगोदर वैकुंठाला गेले. असे म्हणतात की, संताजी महाराजांचे निधन झाले त्यावेळी कितीही प्रयत्न केले तरी महाराजांचे संपूर्ण शरीर मातीत गाडले जात नव्हते. त्यांचा चेहरा सतत वर राहत होता. तेव्हा आपले वचन पूर्ण करण्यासाठी वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आले आणि त्यांनी ३ मुठी माती टाकली. त्यानंतर जगनाडे महाराजांचा संपूर्ण देह झाकला गेला.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या