मंगळवार ६ फेब्रुवारी २०२४ रोजी एकादशी आणि संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा आहे. या वर्षी निवृत्तीनाथांच्या समाधी सोहळ्याला ७२६ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमीत्त त्र्यंबकेश्वर येथे परंपरागत यात्रा भरते. जाणून घ्या यासंबंधी थोडक्यात माहिती.
निवृत्तीनाथांचा जन्म इ.स.१२७३ शके ११९५ आळंदी देवाची सिद्धबेट या ठिकाणी झाला. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज हे माऊली महा वैष्णव ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव महाराज आणि मुक्ताबाई यांचे थोरले बंधू आणि गुरु देखील होते. वडील विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आई रुक्मिणी विठ्ठलपंत कुलकर्णी होय.
चारही भावंडे आणि आई वडील त्र्यंबकेश्वरला तिर्थभ्रमण करण्यासाठी आले असता त्या ठिकाणी घनदाट अरण्यातून मार्गक्रमण करीत असता व्याघ्राच्या डरकाळीने त्या भांवडाची पळापळ झाली आणि त्यात निवृत्तीनाथ यांचा रस्ता चुकला पुढे ते रस्ता शोधत शोधत पुढे वाट काढत होते तेवढ्यात त्यांना एक गुफा लागली आणि निवृत्तीनाथ त्या गुफेत शिरले.
भगवान शंकरापासून मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, आणि पुढे निवृत्तीनाथ अशी ही एक गुरु एक शिष्य परंपरा होती. निवृत्तीनाथांना गुफेत गुरु भेटले. गहिनीनाथांच्या सान्निध्यात राहून निवृत्तीनाथांनी साधना केली. गुरुकडे राहून ज्ञान ग्रहण केले आणि परत आळंदीला आले. पौष महिन्यातील षट्तीला एकादशीच्या दिवशी निवृत्तीनाथांना हा ज्ञानदृष्टांत झाला यामुळे ही यात्रा भरते, असे सांगितले जाते.
नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी निवृत्तीनाथांची संजीवन समाधी आहे. त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन संस्थान कमिटीच्या वतीने केले जाते. कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, जागर, संगीत भजन, आठ दिवस अगोदर ग्रंथ पारायण मोठ्या प्रमाणात होत असतात. यंदा यात्रा काळात पाच लाख भाविक येण्याचा अंदाज असून सुमारे ६०० दिंड्या त्र्यंबकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ही वैष्णव संप्रदायाची आद्यप्रवर्तन भूमी असून संत ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व गुरु संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे यात्रा-उत्सवानिमित्त निघणाऱ्या पालखी सोहळ्याचे श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात स्वागत करण्यात येते. श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात आलेल्या दिंड्यांद्वारे अभंग - कीर्तन केले जाते. आलेले भाविक कुशावर्त गोदावरी स्नान करून त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन निवृत्तीनाथांचे दर्शन घेतात.
त्र्यंबकमध्ये यंदाच्या यात्रेसाठी होणार्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. यामध्ये २ डीवायएसपी, ६ पीआय, २१ पुरुष पीएसआय व एपीआय, ४ महिला अधिकारी, २१० पोलीस अंमलदार पुरुष आणि ६० महिला व पुरुष अंमलदार यांचा समावेश आहे. यंदाच्या यात्रेसाठी पोलिसांचा असा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या