संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी पंढरपूर येथे प्रस्थानासाठी निघाली आहे. जाणून घ्या पंढरपूर यात्रा आणि आषाढी वारीनिमित्त संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे स्वरूप कसे आहे.
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर हे वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते. नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी निवृत्तीनाथांची संजीवन समाधी आहे. ३ जुलै रोजी संत निवृत्तीनाथांची पुण्यतिथी असून, जेष्ठ वद्य द्वादशी शके १२१९ रोजी भगवान पांडुरंगाने स्वतः श्री निवृत्तिनाथ महाराजांना श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधि दिली असे सांगितले जाते.
निवृत्तीनाथांचा जन्म इ.स.१२७३ शके ११९५ आळंदी देवाची सिद्धबेट या ठिकाणी झाला. वडील विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आई रुक्मिणी विठ्ठलपंत कुलकर्णी होय. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज हे माऊली महा वैष्णव ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव महाराज आणि मुक्ताबाई यांचे थोरले बंधू आणि गुरु देखील होते.
आषाढी एकादशी निमित्त सर्व संताच्या पालख्या पंढरपूरला जातात. एकादशीनिमित्त भरणारी पंढरपूरची यात्रा ही महाराष्ट्रातला आकर्षणाचा सोहळा आहे. वारकरी पाऊस-वाराचीही फिकर नकरता, पायी टाळ-मृदुंगाच्या गजरात विविध खेळ खेळत, रिंगण करत पंढरपूरला जमतात. या पायी दिंडीत गावोगावचे लोकंही सहभागी होतात. किर्तनात तल्लीन झालेले वारकरी वाट तुडवत पंढरपूरला जमून विठ्ठलाच्या भेटीचा आनंद घेतात.
संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर माऊली, संत निवृत्तीनाथ यांची पालखी पंढरपूरला निघाली असून, त्र्यंबकेश्वर येथून संत निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा महिन्याभराचा असेल. २० जूनला दुपारी दोनला संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिरातून प्रस्थान केलेला हा पालखी सोहळा २२ आणि २३ जूनला नाशिकमध्ये पोहचला असून, २ जुलैला नगरमध्ये मुक्काम केल्यावर ३ जुलै रोजी सकाळी १० ते १२ वाजे दरम्यान संत निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा होईल.
१६ जुलै रोजी वाखरी येथील सोहळा पार पाडल्यानंतर पंढरपूरमध्ये प्रदक्षिणा मार्गावरील श्री निवृत्तीनाथ महाराज मठात पालखी मुक्कामी पोहचेल. पंढरपूरमध्ये विठूरायाची आषाढी एकादशी १७ जुलैला असून २० जुलैपर्यंत पालखीचा मुक्काम पंढरपूरमध्ये असेल. त्यानंतर पालखी सोहळा त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान करेल.
पालखी सोहळ्यात दररोज सायंकाळी सहा ते आठ कीर्तन होईल. रात्री आठ ते साडेनऊ यावेळेत महाप्रसाद होणार आहे. दातली (ता. सिन्नर) येथे मंगळवार दि. २५ जूनला दुपारी पहिले गोल रिंगण, ८ जुलैला कर्जतच्या धांडेवस्तीवर उभे रिंगण आणि परत १३ जुलै दगडी अकोले भागात गोल रिंगण होणार आहे.
त्र्यंबकेश्वर वरून निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज रथ पालखी सध्या पंढरपूर कडे वाटचाल करीत असून, वांबोरी ते डोंगरगण हा रस्ता घाटाचा असल्याने हा रथ या घाटात बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढला जातो. फक्त या पाच किलोमीटर अंतरावर रथ ट्रॅक्टर ओढतो एरवी सर्व प्रवास बैलजोडी हा रथ ओढते.