आषाढ वद्य त्रयोदशी म्हणजे संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचा समाधी दिन. नामदेव महाराजांच्या सोबतच त्यांच्या कुटुंबीयांनी व संत जनाबाई यांनी सुध्दा याच ठिकाणी समाधी घेतली.
पंढरपुरात नामदेव महाराजांचे राहते घर – केशीराज मंदिर व विठ्ठल मंदिर येथील नामदेव पायरी या दोन्ही ठिकाणी हा दिन साजरा होतो. संत नामदेव हे आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये (शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी) पंढरपूर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले. संतांच्या चरणधूळीचा लाभ व्हावा म्हणून ‘ नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे । वरी संत हिरे पाय देती ।।’ असे म्हणत विठ्ठल मंदिराच्या पायरीशी समाधी घेतली .
पत्नी राजाई, मोठी बहीण आऊबाई; नारा, विठा, गोंदा, महादा हे त्यांचे चार पुत्र व एक मुलगी लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. स्वतःला ‘नामयाची दासी’ असे म्हणणार्या संत जनाबाई याही त्यांच्या परिवारातील एक सदस्य होत्या.
नामदेव नाव मुखी हरिनाम
देव सुद्धा जेवी ज्याचे हातून
संतश्रेष्ठ नामदेव महाराज
संजीवन समाधी दिनानिमित्त विनम्र अभिवादन
…
अमृताहूनी गोड नाम तुझें देवा
मन माझे केशवा कां बा नेघे
संत शिरोमणी नामदेव महाराज
यांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त विनम्र अभिवादन
…
नाचू कीर्तनाचे रंगी
ज्ञानदीप लावू जागी ||
संतश्रेष्ठ नामदेव महाराज
संजीवन समाधी दिनानिमित्त विनम्र अभिवादन
…
नामदेव महाराज खूप लहान असताना, त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितले `आज देवाला प्रसाद तू दाखव. त्या दिवशी नामदेवांनी नुसता नेवैद्य दाखविला नाही तर देवापुढे वाट बघत बसले की केव्हा हा खाईल. त्या अत्यंत निरागस अपेक्षेला मान देऊन प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्यासमोर प्रकट झाले व नामदेवांनी दिलेला प्रसाद त्यांनी भक्षण केला. कुत्र्याने चपाती पळवली त्याला ती कोरडी खाऊ लागू नये म्हणून संत नामदेव महाराज, तुपाची वाटी घेऊन त्याच्यामागे लागले.
एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने संत नामदेव औंढा येथे नागनाथाच्या दर्शनासाठी गेले असता मंदिरात भजन/कीर्तन न करण्यास पुजाऱ्यांनी त्यांना विनवले. त्यांच्या विनंतीस मान ठेवून, नामदेव मंदिराच्या मागील बाजूस बसून दर्शनासाठी नागनाथाची आळवणी करू लागले. नामदेवाची भक्ती बघून त्यांना दर्शन देण्यासाठी देवाने पूर्वाभिमुख असलेले मंदिर फिरवून पश्चिमाभिमुख केले, ते आजतागायत तसेच आहे.
संबंधित बातम्या