Sant Gadge Baba Punyatithi : संत गाडगेबाबा यांची आज २० डिसेंबर रोजी पुण्यतिथी आहे. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. जाणून घ्या डेबूजी गाडगेबाबा कसे झाले? त्यांचे शेवटचे किर्तन कुठे झाले?
गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. डेबूजींचे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत.
दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले.
संत गाडगे महाराजांनी आपल्या किर्तनाव्दारे जनजागृती केली. गाडगेबाबांच्या किर्तनाची तऱ्हा वेगळी होती. स्वतंत्र शैली व परखड बोली हे त्यांचे वैशिष्टय आहेत. १४ नोव्हेंबर १९५६ रोजी संत गाडगे बाबांचे पंढरपूर येथे झालेले किर्तन हेच त्यांचे अखेरचे किर्तन ठरले. २० डिसेंबर १९५६ रोजी पेढी नदीच्या काठावर वलगाव (अमरावती) येथे त्यांचा मृत्यू झाला. गाडगेनगर, अमरावती येथे त्यांचे स्मारक आहे.
१. संत गाडगेबाबा महाराज यांची समाधी कोठे आहे?
उत्तर. संत गाडगेबाबांची समाधी अमरावतीला आहे.
२. संत गाडगेबाबा महाराज यांना किती मुलं होती?
उत्तर. संत गाडगेबाबांना चार मुली होत्या.
३. संत गाडगेबाबा महाराज यांचा जन्म कोणत्या गावी झाला?
उत्तर. गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला.
४. संत गाडगेबाबा महाराज यांचे संपूर्ण नाव कोणते?
उत्तर. संत गाडगेबाबांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते.
५. संत गाडगेबाबा महाराज यांचे गाजलेले भजन कोणते?
उत्तर. "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला" हे गाडगे महाराजांचे आवडते आणि गाजलेले भजन होते.
संबंधित बातम्या