गाडगे महाराज हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी राणोजी जाणोरकर तर आईचे नाव सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते. त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी, शेणगाव महाराष्ट्र येथे झाला.
समाज प्रबोधन करण्यासाठी ते विविध गावांना भटकत असत. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत. गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे ते समाजसुधारक होते.
माणसात देव शोधणार्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून अनाथांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम व विद्यालये सुरू केली. "तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा.
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत.
देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत आणि आपले तत्त्वज्ञान पटवून देत. संत व सुधारक या दोन्हीही वृत्ती गाडगेमहाराजांत होत्या.
गाडगे महाराजांचे अमरावती जवळ पेढी नदीच्या काठावर, वडगाव जि. अमरावती २० डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान प्रकल्प २०००-०१ मध्ये सुरू केला.
दान घेण्यासाठी हात पसरू नका, दान देण्यासाठी हात पसरा.
…
काही करुन मरा. फक्त खाऊन मराल तर फुकट जन्म आहे.
…
कोणी तुम्हाला जात विचारली, तु कोण? तर म्हणावं मी माणूस. माणसाला जाती दोनच आहेत. बाई आणि पुरुष. या दोनच जाती आहेत. तिसरी जातच नाही.
…
देवासाठी पैसा खर्च करू नका. तोच पैसा शिक्षणाला द्या. मंदिराची भर करू नका. जो विद्यार्थी हुशार आहे, तो पैसा त्याला द्या. धर्मकृत्य करण्यासाठी नाही, विद्या घेण्यासाठी पैसा खर्च करा.
…
शाळेहून थोर मंदिर नाही. उदार देणगी शाळेला द्या. भक्तीचा प्रसार नाही श्रेयस्कर, शिक्षण प्रसार सर्वश्रेष्ठ.
…
माणसाचे खरोखर देव कोणी असतील तर ते आहेत “आईबाप.” आई बापाची सेवा करा.
…
गाय सुखी, तर शेतकरी सुखी आणि शेतकरी सुखी, तर जग सुखी. म्हणूनच गोपालन, पशुपालन प्रेमाने करा आणि सर्व प्राणिमात्रांवर दया करा. हाच आजचा धर्म आहे.
…
दुःखाचे डोंगर चढल्या शिवाय सुखाचे किरण दिसत नाहीत.