आषाढ कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी व्रत पाळलं जाईल. हे व्रत गुरुवार, ०६ जुलै रोजी सकाळी ०६.३० वाजता सुरू होईल आणि शुक्रवार,०७ जुलै रोजी पहाटे ०३.१२ वाजता समाप्त होईल. अशात तिथीनुसार, गजानन संकष्टी चतुर्थीचे व्रत ०६ जुलै रोजी पाळले जाईल. हे व्रत श्रीगणेशाला समर्पित असून, या दिवशी विधीपूर्वक पूजा केल्यास गणपतीसोबतच शिवाचा आशीर्वादही प्राप्त होतो, असे सांगितले जाते.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी १०.१४ ते दुपारी १२.२५ पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असेल. यानंतर संध्याकाळी ०७.२२ ते ०८.३० पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे. चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच हे व्रत सोडलं जातं. ०६ जुलै रोजी चंद्रोदयाची वेळ रात्री १०.१३ आहे. चंद्राला जल अर्पण केल्यावरच हे व्रत सोडलं जातं.
आषाढ संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि पूजेचं ठिकाण स्वच्छ करून त्यावर गंगाजल शिंपडावे.
त्यानंतर श्रीगणेशाला वस्त्र, जानवं अर्पण करून देवघरात दिवा लावावा.
श्री गणेशाला टिळा लावावा आणि ताजी फुलं अर्पण करावी.
यानंतर गणपतीला २१ दुर्वा अर्पण कराव्या.
गणरायांना प्रिय असे उकडीचे मोदक, त्यावर तुपाची धार घालून अर्पण करावे.
यानंतर विधीवत पूजा करावी आणि त्यानंतर गणरायांची आरती म्हणून गणपती स्तोत्र वाचावे.
पूजेत कोणत्याही प्रकारे अनावधानाने झालेल्या चुकीची श्री गणरायांची माफी मागावी.
सर्व देवता ज्या गणेशाची पूजा करतात त्याच गणरायाची पूजा घरोघरी मांडली जाते. संकष्ट चतुर्थीव्रत गणपतीसाठी किंवा श्रीगणेशाची आपल्यावर सदैव कृपा राहावी यासाठी केलं जातं. संकष्ट चतुर्थीला भक्तीभावाने व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या प्रत्येक मनोकामना श्रीगणेश पूर्ण करतात, असे मानले जाते. याशिवाय श्रीगणेश त्यांच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करतात असंही मानलं जातं.