मराठी बातम्या  /  धर्म  /  Safala Ekadashi 2024: नववर्षाची पहिली सफला एकादशी, यश मिळवण्यासाठी जाणून घ्या पूजा पद्धत व कथा

Safala Ekadashi 2024: नववर्षाची पहिली सफला एकादशी, यश मिळवण्यासाठी जाणून घ्या पूजा पद्धत व कथा

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 07, 2024 05:11 AM IST

Safala Ekadashi 2024 : प्रत्येक कृष्ण व शुक्ल पक्षात एकादशी तिथी येते. ही तिथी भगवान विष्णूंना समर्पीत असून, एकादशी तिथीचे व्रत भक्तिभावाने केले जाते. जाणून घ्या नववर्षातील पहिल्या एकादशी तिथीच्या व्रताची तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत आणि कथा.

Safala Ekadashi 2024
Safala Ekadashi 2024 (Prathmesh Avasare )

वर्षाची पहिली एकादशी रविवारी, ७ जानेवारी रोजी आहे. मार्गशीर्ष मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशी म्हणतात. या दिवशी विधिवत पूजा करण्याने आपल्याला प्रत्येक कार्यात सफलता मिळते आणि आपली सर्व कार्ये निर्विघ्न पार पडतात, अशी मान्यता आहे. चला तर जाणून घेऊया या एकादशीची पूजा पद्धत आणि व्रत कथा...

सफला एकादशी व्रत मुहूर्त

पंचांगानुसार सफला एकादशी तिथी ६ जानेवारी रोजी मध्यरात्री म्हणजेच ७ जानेवारी रोजी अर्धरात्रौ १२ वाजून ४१ मिनिटांनी होणार आहे. तर ८ जानेवारी रोजी अर्धरात्रौ १२ वाजून ४६ मिनिटांनी समाप्त होणार आहे. त्यामुळे उदयातिथीनुसार सफला एकादशीचे व्रत ७ जानेवारीला आहे.

Ekadashi 2024: वर्ष २०२४ मध्ये कोणत्या तारखेला कोणती एकादशी जाणून घ्या

सफला एकादशी पूजा पद्धत

सकाळी लवकर उठून स्नान करून देवघरात पूजा करावी. उपवासाचा संकल्प घ्यावा. चौरंगावर लाल वस्त्रावर भगवान विष्णूंचा फोटो ठेवा. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा. फुल,फळ,धूप, दिप, नैवेद्य अर्पण करा. आरती करा व कथा पठण करा.

एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्तांनी दिवसभर अन्न सेवन करू नये आणि फलहार करू शकतात. या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी भगवान विष्णूची पूजा करावी. दिवसभर विष्णूच्या मंत्रांचा जप करा, विष्णूच्या कथा पठण करा. दुसऱ्या दिवशी सकाळी द्वादशीला पुन्हा विष्णूची पूजा करावी. पूजेनंतर गरजू लोकांना अन्नदान करा आणि उपवास सोडा.

एकादशी कथा

पद्मपुराणानुसार चंपावती शहरावर राजा महास्मियनचं राज्य होतं. राजाला पाच मुले होते. ज्यातला मोठा मुलगा लुंभक चारित्र्यहीन होता. तो नेहमी पापकर्मात गुंतलेला असायचा. उपद्रवी अन्न खाणे, नशा करणे असे त्याचे शौक होते. त्याच्या या सवयींमुळे राजा त्याच्यावर नाराज झाला आणि त्याने लुंभकाला राज्यातून हाकलून दिलं. त्यानंतर लुंभक जंगलात राहू लागला.

एकदा कडाक्याची थंडी पडली होती. लुंभक त्या थंडीने कुडकुडत होता. त्याला थंडीमुळे रात्री झोप येत नव्हती. एकेदिवशी तो रात्रभर थंडीने कुडकुडला आणि त्यानंतर तो बेशुद्ध पडला. तो मार्गशीर्ष महिन्यातल्या कृष्णपक्षातला दहावा दिवस होता. दुसऱ्या दिवशी शुद्धीत आल्यावर त्याला आपल्या पापकर्माचा पश्चात्ताप झाला आणि त्याने जंगलातून काही फळं गोळा केली. पिंपळाच्या झाडाखाली ती फळं त्याने ठेवली आणि त्याने भगवान विष्णूची आराधना सुरु केली. त्या रात्रीही त्याला झोप येत नव्हती. तेव्हाही, त्या अवस्थेतही त्याने श्रीविष्णूंची आराधना सुरुच ठेवली. सफला एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने त्यांनी धर्माचा मार्ग स्वीकारला आणि त्याने सत्कर्म करायला सुरुवात केली.

राजा महिषमानला जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा त्याने लुंभकला परत बोलावून राज्याची जबाबदारी दिली. तेव्हापासून सफला एकादशीचे व्रत केले जाते. ही एकादशी सर्व कार्य सिद्धीस नेणारी मानली जाते आणि आपल्या सर्व कामात यश मिळते असे मानले जाते.

WhatsApp channel

विभाग