Shri Shankar Maharaj Prakatya Din: ९ नोव्हेंबर, अर्थात कार्तिक शुद्ध अष्टमी किंवा गोपालाष्टमीला सन १७८५ मध्ये नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात अंतापूर या गावात श्री. शंकर महाराज दिव्य बालकाच्या रुपात प्रकट झाले. त्यांचे वडील चिमणाजी हे शिवभक्त होते. त्यांनी आपल्या बालकाचे नाव शंकर असे ठेवले.
श्री. शंकर महाराज यांचे वडील चिमणाजी यांना मूलबाळ नव्हते. ते शिवभक्त होते. असे सांगितले जाते की त्यांना एकदा स्वप्नात दृष्टान्त झाला. तू रानात जा. तुला तेथे बाळ मिळेल ते घेऊन ये, असे त्यांना सांगितले गेले. ते त्या दृष्टान्ताप्रमाणे रानात गेले असताना तिथे त्यांना हा दोन वर्षांचा बाळ मिळाला. हा शंकर देवाचा प्रसाद आहे असे म्हणून त्यांनी त्याचे नाव शंकर असे ठेवले. शंकर आपल्या माता-पित्याजवळ काही वर्षे राहिला. नंतर या बाळाने माता-पित्यांनाच आशीर्वाद दिला की, तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. यानंतर शंकर घराबाहेर पडला. श्री शंकर महाराजांना नेमके एक नाव नाही. ते अनेक नावांनी वावरत. शंकर या नावाप्रमाणेच सुपड्या, कुंवरस्वामी, गौरीशंकर अशा नावानीही ते ओळखले जात.
श्री. शंकर महाराजांना जसे एक नाव नव्हते तसेच त्यांचे रूप ही वेगळे होते. काही ठिकाणी त्यांचा उल्लेख अष्टावक्र असाही केलेला आढळतो. ते उंचीने लहान होते. त्यांचे डोळे मोठे होते, ते अजानुबाहू, म्हणजेच उभे राहिले असताना हात गुडघ्याला सहज लागत असत. ते नेहमी गुडघे वर करुन बसत असत.
सद्गुरू श्री. शंकर महाराज हे अष्टावक्र होते. त्यांचा डावा पाय मोठा आणि उजवा पाय लहान होता. डावा पाय हा स्वामींचा आहे, तर उजवा पाय माझा आहे, असे ते म्हणत असत. शंकर महाराज हे सद्गुरू श्रीस्वामींना आई म्हणत आणि स्वामींआईने मला मांडीवर घेऊन दुध पाजले आहे, असे ते सांगत. ते राजाधिराज श्रीस्वामी समर्थ महाराजांचे परमशिष्य होते.
सद्गुरू शंकर महाराजांच्या असंख्य लीला प्रचलित आहेत. नगरला सरदार मिरींकर यांच्याकडे प्रवचन सुरू असताना श्री. शंकर महाराजांनी श्री. माऊलींच्या एकाच ओवीचे पन्नास वेगवेगळे अर्थ सांगून उपस्थितांना आश्चर्यचकित केले होते. वरकरणी पाहता महाराजांचे वागणे-बोलणे विचित्र वाटत असे. मात्र तो लोकांना टाळता यावे म्हणून दिखावा होता. मद्यपान करणे, धुम्रपान करणे हे सर्वकाही फक्त नाटक होते. आतून ते सदैव आत्मरंगी रंगलेले आणि परमज्ञानी असल्याचे सांगितले जाते.
मला काहीएक कमी नाही. याचे कारण म्हणजे मला कमावण्यासारखे काही नाही. आणि माझ्याजवळ काही नाही म्हणून मला गमावण्यासारखेही काही नाही, असे सद्गुरू श्री. शंकर महाराज म्हणत असत. त्यांनी आपल्या भक्तांना आणि समाजाला दिशा देण्यासाठी व्यक्त केलेले विचार आजही भक्तांच्या मनात आहेत.
> सुख-शांती हवी असेल, तर इच्छा, इर्षा, असुया, महत्त्वाकांक्षा, हावरेपणा सोडून द्या. असे केल्याने अहंकार नष्ट होईल आणि त्याने सतत अस्थिर होणारे मन स्थिर होईल.
> सामाजिक-धार्मिक-नैतिक अधिष्ठान हे आपल्या गुरुंमुळे प्राप्त होते. पण लोक ते अधिष्ठान विसरतात आणि लौकिक सुखामागे लागतात. त्यामुळे सत्य-नीती हा धर्म होण्याऐवजी पैसा हा धर्म झाला आहे. गुरुस ईश्वर मानून त्यांचे अधिष्ठान जपणे आवश्यक आहे.
> गुरु व देव याविषयी उत्कट प्रेम व दृढ श्रद्धा ठेवा.
> जे गुरुला ईश्वर मानून दृढ श्रद्धेने भजतात. त्यांचाच गुरुकृपेने उद्धार होतो.
> देव सर्वव्यापी आहे असे लोक मानत असतात. पण लोक जे बोलतात ते आचरणात मात्र आणत नाहीत. प्रथम आत्मबोध करावा, त्यानंतरच आत्मसाक्षात्कार घडून येऊ शकतो.
> साधनमार्गात अपेक्षा महत्त्वाची असते, तशी पूर्ती महत्त्वाची असते. त्यासाठी विश्वास व श्रद्धा फार आवश्यक आहे. विद्वत्तेने देवाला तोलणेमापणे गैर आहे. विद्वान मंडळींना शंकाच फार येतात. त्यासाठी त्यांनी आपल्याच अंतरंगात डोकावून पाहण्याची गरज आहे. त्यायोगे शंका नाहीशा होऊन कार्यप्रवृत्तीची प्रेरणा मिळते.
> स्वार्थीपणाचा बाजार भरला आहे. त्यातूनच अपेक्षा वाढतात. स्वार्थासाठी मित्राला मदत, कीर्तीसाठी दानधर्म, कौतुकासाठी देणगी मग या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत की, लगेच राग येतो. तोच मुळी आत्मकल्याणाच्या आड येतो.
> आशा, इच्छा, हव्यास, वित्त यांची हाव कधीच संपत नाही. मग त्यापोटी दु:ख-वेदना होणारच. बोटीतून प्रवास म्हटला की बोट हलणारच. मूल हवे तर प्रसूतीचा त्रास सोसलाच पाहिजे. शरीर म्हटले की व्याधी आलीच.
> जे आत्मदर्शन प्राप्ती करुन घेतात त्यांना जन्म-मृत्यू नसतो. ते जगद्उद्धारार्थ अवतार म्हणून पुन्हा येतात.
> सिद्धीपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे.
> सद्गुणांची वाढ झाली तर माणसात देवत्व प्रकट होत असते.
> आम्ही कैलास रहिवासी शंकर आहोत. लोकांना देव समजावून सांगण्यासाठी इथे आलो. मनुष्य जन्म असेतोवरच हे समजून घ्या. आत्मकल्याण करुन घ्या. जीवनाचे सार्थक करा.
सद्गुरू श्री. शंकर महाराज यांनी वैशाख शुद्ध अष्टमी (२६ एप्रिल १९४७) या तिथीला पुणे येथील धनकवडी भागात पद्मावती येथे समाधी घेतली. सदगुरू शंकर महाराजांनी भक्तांना ज्या ज्या ठिकाणी दर्शन दिले त्या त्या ठिकाणी मंदिरे उभारण्यात आलेली आहेत. या सर्व मंदिरांमध्ये वैशाख शुद्ध अष्टमीला समाधी उत्सव साजरा होतो. पुण्याच्या कात्रज घाटापूर्वी व धनकवडी भागात रस्त्यालगतच शंकर महाराज यांचे समाधी मंदिर आहे. हे स्थान महाराजांच्या लाखो भक्तांचे श्रध्दास्थान आहे.