Ayodhya temple news : अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाची तयारी पूर्ण; अमिताभ, तेंडुलकरसह दिग्गजांना आमंत्रण
मराठी बातम्या  /  धर्म  /  Ayodhya temple news : अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाची तयारी पूर्ण; अमिताभ, तेंडुलकरसह दिग्गजांना आमंत्रण

Ayodhya temple news : अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाची तयारी पूर्ण; अमिताभ, तेंडुलकरसह दिग्गजांना आमंत्रण

HT Marathi Desk HT Marathi
Updated Dec 07, 2023 01:09 PM IST

Ayodhya Raam Temple: अयोध्या राम मंदिराचे काम आता पूर्णत्वास आले असून, २२ जानेवारी २०२४ रोजी उदघाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळ्याला देशातील विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir

Ayodhya Ram Temple udghatan: अयोध्येतील श्री राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची सर्वांनाच आतुरता आहे. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या उदघाटन सोहळ्याची आमंत्रणे पोहोचली आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गज या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत राम आणि सीतेची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि दीपिका चिलखिया यांना २२ जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनासाठी खास आमंत्रित करण्यात आले आहे. यासोबतच मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटा, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांसारखे उद्योगपती आणि सेलिब्रिटी या सोहळ्यात उपस्थित राहतील. आरएसएस प्रमुख मोहन भागवत, योगगुरू बाबा रामदेव, ४००० संत, लेखक, पत्रकारही अयोध्येत येणार आहेत. 

Alandi yatra 2023: उत्पत्ती स्मार्त एकादशीला आळंदी यात्रा, काय आहे इतिहास आणि महत्त्व

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगातील ५० देशांतून किमान एका व्यक्तीला प्रतिनिधी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. कारसेवेच्या दरम्यान बलिदान दिलेल्या ५० कारसेवकांची कुटुंबेही येणार आहेत. पुजारी, सरकारी कर्मचारी, निवृत्त लष्करी अधिकारी, संगीतकार आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे.

८ हजार निमंत्रणं, ३ हजार व्हीव्हीआयपी

देशभरातून आणि परदेशातून या भव्यदिव्य सोहळ्यासाठी सुमारे ८००० लोकांना निमंत्रण पत्रे पाठवण्यात आली असून त्यापैकी ३००० हून अधिक व्हीव्हीआयपी लोक आहेत. उद्घाटनावेळी मंदिर कारसेवेशी संबंधित कुटुंबांना खास आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय सुमारे ५० परदेशी पत्रकार, न्यायाधीश, शास्त्रज्ञ, कवी आणि विविध क्षेत्रातील बड्या व्यक्तींना निमंत्रण पत्रे पाठवण्यात आली आहेत.

संपूर्ण तयारी पूर्ण होत आली असून, पौष शुक्ल द्वादशी, विक्रम संवत २०८० म्हणजेच सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी रामलला त्यांच्या जागी विराजमान होतील आणि संपूर्ण जग त्याचे साक्षीदार होणार आहे.

Whats_app_banner