RSS Chief Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आपल्या वक्तव्यांवरून नेहमीच चर्चेत असतात. भागवत दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यादरम्यान पथनमथिट्टा जिल्ह्यातील पंपा नदीच्या काठावर वार्षिक चेरुकोलपुझा हिंदू अधिवेशनाला संबोधित केले. यावेळी त्यांनी हिंदूच्या एकतेवर भर देताना त्यांनी कोणते कपडे घालावेत, कशा प्रकारचे अन्न खावे याविषयी वक्तव्य केले आहे. तसेच त्यांनी तमामा हिंदूंना इंग्रजी न बोलण्याचा सल्ला दिला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख भागवत उपस्थितांना संबोधित करताना म्हणाले की, 'हिंदूंनी सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहताना पारंपारिक कपडे घालावेत आणि इंग्रजी बोलू नये. "धर्म" हा हिंदू धर्माचा आत्मा आहे आणि प्रत्येकाने त्याचे वैयक्तिकरित्या पालन केले पाहिजे. प्रत्येक घरातील लोकांनी आठवड्यातून किमान एकदा प्रार्थना करण्यासाठी किंवा त्यांची जीवनशैली परंपरेनुसार आहे की नाही यावर चर्चा करण्यासाठी एकत्र यावे.
मोहन भागवत पुढे म्हणाले की, 'आपण ज्या भाषेत बोलतो, ज्या ठिकाणी जातो आणि आपले कपडे परंपरेनुसार आहेत की नाही याचाही आपण विचार केला पाहिजे. आपण आपल्या भागातील इतर ठिकाणी जाऊन आपल्या मदतीची गरज असलेल्या बांधवांना भेटले पाहिजे. आपण इंग्रजी बोलू नये आणि आपले स्थानिक अन्न खावे. कार्यक्रमांना उपस्थित राहताना आपण आपले पारंपारिक कपडे घालावेत, पाश्चात्य कपडे घालू नयेत.'
भागवत यांनी त्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात केरळचे आध्यात्मिक नेते आणि समाजसुधारक नारायण गुरु यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशनही केले. यापूर्वी, त्यांनी १६ ते २१ जानेवारी दरम्यान संघाशी संबंधित कार्यक्रमांसाठी या राज्याचा दौरा केला होता. भागवत म्हणाले की, ‘हिंदू समाजाने आपल्या अस्तित्वासाठी एकत्र आले पाहिजे आणि एक समुदाय म्हणून स्वतःला मजबूत केले पाहिजे. पण, बलवान असण्याचेही काही भय असतात. शक्तीचा वापर कसा केला जातो हे महत्त्वाचे आहे. यामुळे इतर कोणाचेही नुकसान होऊ नये. ते म्हणाले की धर्म हा जगभरातील संघर्षांचे कारण आहे कारण अनेक लोकांना वाटते की त्यांचा धर्म आणि श्रद्धा सर्वोच्च आहेत. ते म्हणाले की हिंदू धर्म वेगळा आहे कारण तो सनातन धर्माचे पालन करतो आणि एकतेचे आवाहन करतो.’
सरसंघचालक मोहन भागवत पुढे म्हणाले की, हिंदू धर्मात कोणीही मोठा किंवा लहान नाही. जातीचाही हिंदूंना काही फरक पडत नाही आणि अस्पृश्यतेला हिंदू धर्मात स्थान नाही. त्यांनी सर्व हिंदूंना एकमेकांचा आदर करण्याचे आवाहन केले आणि सांगितले की जर सर्व हिंदू एकत्र आले तर जगाला त्याचा फायदा होईल. भागवत यांनी स्वतःची ओळख पटवणे, सर्वांना समान वागणूक देणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे यासह एकत्र येण्याचे मार्ग देखील सुचवले.
भागवत पुढे म्हणाले की पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी धोरणात्मक बदल होण्यास वेळ लागेल, परंतु लोक तीन छोट्या गोष्टी करू शकतात. पाणी वाचवा, झाडे लावा आणि प्लास्टिकचा वापर थांबवा. कुटुंबांमध्ये संस्कारांचे महत्त्व काय, यावर चर्चा करण्याचे आवाहन सरसंघचालकांनी यावेळी केले. या चर्चेचा केरळमधील अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या समस्येवर याचा परिणाम होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.
भागवत पुढे म्हणाले की, शक्तिशाली असण्याचा इतर जगासाठीही धोकादायक असू शकते, कारण शक्ती ही शक्ती असते, तिला दिशा देणारा माणूसच असतो, ती शक्ती वापरणारा माणूसच असतो, ती त्याच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून असते, दुष्ट लोक वाद वाढवण्यासाठी ज्ञानाचा वापर करतात. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येते की आपण आपले मत वाढवण्यासाठी पैशाचा वापर करतो, आपण इतरांना त्रास देण्यासाठी शक्तीचा वापर करतो, परंतु संत लोकांच्या बाबतीत उलट घडते. चांगले लोक शिक्षणाचा वापर ज्ञान वाढवण्यासाठी करतात, संपत्तीचा वापर दान करण्यासाठी करतात, शक्तीचा वापर दुर्बलांचे रक्षण करण्यासाठी करतात. ते म्हणाले की हिंदू ऐक्य जगासाठी फायदेशीर ठरेल, हे कसे होईल याबद्दल शंका नाही. कारण, हिंदू हे एका स्वभावाचे नाव आहे, हिंदू धर्मात अनेक श्रद्धा, पंथ आणि संप्रदाय आहेत.
यावेळी त्यांनी सांगितले की, 'हिंदू समाज जगाचा गुरु होईल यात शंका नाही. हिंदू समाजाला आपले जीवन पुढे नेण्यासाठी हिंदू एकतेची आवश्यकता आहे, ते शक्ती निर्माण करेल, हे सांगण्यासाठी इतर कोणताही युक्तिवाद देण्याची गरज नाही. जगात एक नियम आहे, जो समाज संघटित असतो तो वर पोहोचतो, जो समाज संघटित नसून विभागलेला असतो, तो समाज कोसळतो. इतिहास आणि वर्तमान दोन्ही याचे साक्षीदार आहेत.'
संबंधित बातम्या