अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी आतापर्यंत १,८५० कोटी रुपये खर्च आला असल्याची माहिती पुढे आली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत २०२३-२४ या आर्थिक वर्षातील उत्पन्न आणि खर्चाचा तपशील सादर करण्यात आला. गेल्या आर्थिक वर्षात मंदिरात सुरू असलेल्या बांधकामावर ७७६ कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
अयोध्येतील मणी रामदास छावणी येथे ही महंत गोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यावेळी उपस्थित होते. आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये मंदिर उभारणीवर एकूण ७७६ कोटी रुपये खर्च करण्यात आला. त्यापैकी ५४० कोटी रुपये मंदिर उभारणीवर तर १३६ कोटी रुपये अन्य शीर्षकाखाली खर्च करण्यात आल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. राम मंदिर उभारणीवर आतापर्यंत एकूण १८५० कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, २०२४-२५ या आर्थिक वर्षात मंदिरबांधणी आणि इतर संबंधित खर्चावर ८५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितले. गेल्या आर्थिक वर्षात ट्रस्टला ३६३.३४ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले होते, अशी माहितीही मंडळाने यावेळी दिली. त्यापैकी २०४ कोटी रुपये बँकेकडून व्याज आणि ५८ कोटी रुपये अयोध्येतील कार्यालयात रोख व धनादेशाद्वारे प्राप्त झालेल्या देणग्या होत्या.
अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीत २४ कोटी ५० लाख रुपयांची रोख रक्कम ट्रस्टला मिळाली आहे. ही रक्कम अयोध्येतील ट्रस्टच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. ट्रस्टला देशभरातून ऑनलाइन देणग्यांद्वारे एकूण ७१ कोटी रुपये मिळाले आहे. याव्यतिरिक्त ट्रस्टला आपल्या एफसीआरए बँक खात्यात अनिवासी भारतीयांकडून देणग्यांद्वारे १० कोटी ४३ लाख रुपये मिळाले आहे.
राम मंदिर ट्रस्टला प्राप्त झालेल्या २० किलो सोने आणि ९०० किलो चांदी सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यावर्षी सप्टेंबरमध्ये एसपीएमसीच्या हैदराबाद कार्यालयात याची चाचणी घेतली जाईल. मात्र, अद्याप तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.
राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावर पांढऱ्या संगमरवराचा राम दरबार उभारण्यात येणार आहे. जयपूरमध्ये त्याचे बांधकाम सुरू आहे. राय यांनी सांगितले की, एका भक्ताने २१०० कोटी रुपयांचा धनादेश पोस्टाद्वारे ट्रस्टला पाठविला होता. चेकवर पाठवणाऱ्याचे नाव, पत्ता आणि मोबाइल नंबर होता. मात्र, हा धनादेश पीएम रिलीफ फंडाच्या नावाने देण्यात आला. हा धनादेश पंतप्रधान कार्यालयाला पाठविण्यात आल्याची माहिती राय यांनी दिली.