Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2024 : छत्रपती संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे महान शासक छत्रपती शिवाजी यांचे ज्येष्ठ पुत्र होते. संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला होता. संभाजीराजे २ वर्षांचे असताना त्यांची आई सईबाई यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर राजमाता जिजाबाई (जिजाऊ) यांनी त्यांचा सांभाळ केला.
दरवर्षी १४ मे रोजी (तारखेनुसार) छत्रपती संभाजी महाराज यांची साजरी केली जाते. संभाजी राजेंच्या जयंती दिवशी विविध कर्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच, इतिहासाच्या पानापानांतून महाराजांच्या शौर्याचे धडे घेतले जातात.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टींवर एक नजर टाकूया.
छत्रपती संभाजी महाराजांनाही संस्कृत भाषेचे उत्तम ज्ञान होते. संभाजी राजांनी वयाच्या १४ व्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ लिहिला. बुद्धभूषणात काव्य, शास्त्र, संगीत, पुराण आणि धनुर्विद्या या तीन भागांत अभ्यासाचा उल्लेख केला आहे. त्यात राजा आणि त्याचे गुण, राजाचे सहाय्यक, राजाचे सल्लागार, त्यांची कर्तव्ये, खजिना, किल्ले, सैन्य, गुप्तहेर, नोकर यांची माहिती मिळते.
तर 'धर्म कल्पलता' हा धर्मशास्त्रावरील ग्रंथ केशव पंडित यांनी संभाजी राजेंसाठी लिहिला. अब्बे कारे या परदेशी लेखकाने संभाजी महाराजांच्या युद्धकलेतील कौशल्याचे कौतुक केले आहे. यावरून संभाजी महाराजांची अफाट बुद्धिमत्ता, ज्ञान, अनेक भाषांमधील प्रभुत्व आणि धार्मिक भक्तीचा अंदाज बांधता येतो.
केशवभट आणि उमाजी पंडित यांनी संभाजीराजांना चांगले शिक्षण दिले. अनेक ऐतिहासिक दस्तावेजांनुसार संभाजीराजे अतिशय देखणे आणि शूर होते.
संभाजी महाराज लहानपणीच राजकीय रणनीती आणि गनिमी कावा शिकले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी अनेक मोहिमा यशस्वी केल्या. कोणत्याही मोहिमेत ते कधीही अपयशी ठरले नाहीत.
त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांसारखा योद्धा नव्हता. छत्रपती संभाजी महाराज शासन चालवण्यातही अत्यंत तरबेज होते. ते कुशल संघटक होते. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच छत्रपती झाल्यानंतर संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळ नेमले.
छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या शौर्याच्या बळावर अल्पावधीतच मराठा साम्राज्याचे रक्षण आणि विस्तार केला. संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याच्या १५ पट अधिक असलेल्या मुघल साम्राज्याशी एकहाती लढा दिला. संभाजी राजेंनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण १२० लढाया लढल्या. या १२० पैकी एकाही लढाईत ते अपयशी ठरले नाहीत.
असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धे होते. त्याकाळी संभाजी राजेंशी स्पर्धा करणारा योद्धा नव्हता असे म्हणतात.