महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, भक्त, कवी व समाजसुधारक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ३० एप्रिल रोजी जयंती आहे. महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यात असलेल्या यावली शहीद या गावी ३० एप्रिल १९०९ रोजी तुकडोजी महाराजांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बंडोपंत आणि आईचे नाव मंजुळा होते. ते ब्रम्हभट वंशातले होते. त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे होते. त्यांच्या घराण्याचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा असल्याने लहानपणापासूनच त्यांना ध्यान, भजन, पूजन या गोष्टींची आवड निर्माण झाली.
तिसरीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी शाळा सोडली. वरखेडला आजोळी असताना आडकूजी महाराजांना त्यांनी गुरू केले. पुढे कीर्तन, भजनासाठी ते स्वतःच कविता रचू लागले. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर करून जनप्रबोधन केले. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले.
मराठी व हिंदी भाषांमध्ये तुकडोजी महाराजांनी काव्यरचना केली. स्वातंत्र्य लढ्यात आणि राष्ट्रकार्यात ते सहभागी झाले. त्यांच्या कार्यामुळे ते राष्ट्रसंत बनले. तुकडोजी महाराजांनी सन १९३५ मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे मुख्य वैशिष्ट्य होते. तुकडोजी महाराजांनी सुमारे ५० ग्रंथांची निर्मिती केली असून, त्यांचे अप्रकाशित वाङ्मयही बरेच आहे.
तुकडोजी महाराजांनी गीताप्रसाद, बोधामृत, लहरकी बरखा, अनुभव प्रकाश, ग्रामगीता, सार्थ आनंदमृत, सार्थ आत्म्प्रभाव हे ग्रंथ लिहिलेले आहेत.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विश्व हिंदू परिषेदेच्या संस्थापक उपाध्यक्षांपैकी एक होते. त्यांनी बंगाल दुष्काळ (१९४५), चीन युद्ध (१९६२) आणि पाकिस्तानचा हल्ला (१९६५), कोयना भूकंप विनाश (१९६२) या काळात राष्ट्रीत हेतू लक्षात घेऊन अनेक आघाड्यांवर मदत व पूनर्वसन करण्याचं काम केलं होतं.
आपल्या जीवन यात्रेतून त्यांनी राष्ट्र, स्वातंत्र्यप्राप्ती व राष्ट्रीय एकात्मतेसाठी आदर्श जीवन जगतांना सदाचारातून सुखाकडे, श्रमातून आनंदाकडे, देशभक्ती तुन राष्ट्रहिताकडे, शिक्षणातून प्रगतीकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त केला. राष्ट्रसंतांचे हे कार्य समाजाला आणि विशेषता तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावे.
संत तुकडोजी महाराजांना त्यांच्या कार्याबद्दल माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही पदवी दिली होती. ११ ऑक्टोबर १९६८ गुरुवार रोजी तुकडोजी महाराज ब्रम्हलीन झाले. त्यांच्या चरणी शतश: प्रणाम.