अयोध्यतेली श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतीष्ठेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. सर्वांना येणाऱ्या २२ जानेवारीच्या उद्घाटन सोहळ्याची आतुरता आहे. जगभरात भगवान श्रीरामाचे भक्त आहे. अनेकजण येता जाता जय श्री राम असे म्हणूनच एकमेकांना अभिवादन करतात. असाच एक समुदाय आहे ज्यांची रामभक्ती जगावेगळी आहे. जाणून घेऊया या समुदायाबद्दल.
छत्तीसगड येथील रामनामी समुदायाची आगळी-वेगळी ख्याती जगभर आहे. हा समुदाय आपल्या सर्वांगावर रामनाम गोंदवून घेतो. ज्या व्यक्ती आपल्या माथ्यावर रामाचे नाव गोंदवून घेतात त्यांना सर्वांगी रामनाम म्हणतात तर ज्या व्यक्ती संपूर्ण शरीरावर रामाचे नाव गोंदवून घेतात त्यांना नखशिख म्हणतात.
हा वारसा पुढे परंपरागत चालावा यासाठी या समुदायातील बाळ जेव्हा २ वर्षाचे होते तेव्हा त्याच्या छातीवर राम नाव गोंदवले जाते. या संप्रदायात राम नाव संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे, मात्र हे लोक कधीच कोणत्याच मंदिरात जात नाहीत किंवा कोणत्या मूर्तीची पूजा करत नाहीत.
रामनामी समुदायातील लोकांचा पोषाख म्हणजे संपूर्ण शरीरावर रामाचे नाव, राम नावाची शाल, मोरपंखाची पगडी आणि घुंगरू असा आहे.
प्रत्येक समाजाला स्वतचं वैशिष्ट्य आहे, या समाजाचं वेगळेपण इतरांपेक्षा अनोखं आहे. शिक्षण, नोकरीसाठी किंवा इतर कारणासाठी आजच्या पिढीला बाहेरगावी जावे लागते त्यामुळे काळानुसार या समाजातील तरूणांनी ही प्रथा पूर्णपणे पाळली नसली, तरी त्याला विरोधही केलेला नाही. शरीराच्या कोणत्याही एका भागावर राम-राम लिहून ते संस्कृती जपत आहेत.
असे करण्यामागे एक कारण आहे. असं म्हणतात की, या समुदायातील लोकांना काही उच्चवर्णीयांकडून यापूर्वी मंदिरात प्रवेश करू दिला नाही. याचा विरोध म्हणून या समुदायाना संपूर्ण शरीरावर श्रीरामाचे नाव गोंदवून निषेध केला. याची सुरवात छत्तीसगड राज्यातील जांजगीर-चांपा येथील चारपारा या छोट्या गावी झाली होती.
असं म्हणतात १८९० साली परशुराम नावाच्या एका युवकाने समाजाचा पाया रोवला होता. यास विरोध झाल्यावर १९९२ मध्ये परशुराम व त्याच्या अनुयायांनी कोर्टात अपील केले होते. तेव्हा जिल्हा न्यायाधीशांनी परशुरामाच्या व अनुयायांच्या बाजूने निकाल देत असे सांगितले की, राम हे नाव कोणत्या समूहाची संपत्ती नाही त्यावर साऱ्यांचा अधिकार आहे. त्यानंतर शरीरावर रामाचे नाव गोंदवण्याचे प्रमाण वाढले.