शास्त्रानुसार दरवर्षी शुक्लपक्षात रामनवमी साजरी केली जाते. असे मानले जाते की शुक्लपक्षाच्या नवमीच्या विशेष तिथीला, भगवान रामाचा जन्म झाला. या विशेष तिथीला चैत्र नवरात्र समाप्त होते. रामनवमी हा सण चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो. या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साईबाबा उत्सवाचाही उत्साह पाहायला मिळतो.
आताच नववर्षाच्या सुरवातीला अयोध्येतील राममंदिरात नवप्रतिष्ठा सोहळ्यानंतर भाविकांची मोठी गर्दी येथे सुरू झाली आहे. दरम्यान, रामनवमी लवकरच येत आहे. या वर्षी रामनवमी कधी आहे, शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत जाणून घ्या.
मंगळवार १६ एप्रिल रोजी रामनवमी तिथी दुपारी १ वाजून २३ मिनिटांनी प्रारंभ होईल. आणि बुधवार १७ एप्रिल रोजी रोजी दुपारी ३ वाजून १४ मिनिटांनी समाप्त होईल. सनातन धर्मानुसार हा उत्सव उदयतिथीला साजरा केला जाणार आहे. त्या नियमानुसार १७ एप्रिलला रामनवमी साजरी केली जाणार आहे.
रामनवमी तिथीच्या दिवशी सकाळी ११ वाजून ३ मिनिटांनी हा शुभ काळ सुरु होईल तर दुपारी १ वाजून ३८ मिनिटापर्यंत आहे. या वेळेव्यतिरिक्त, दुपारी १२ वाजून २१ मिनिटांनी परंपरेनुसार श्रीरामाचा जन्मदिवस आहे. तो काळ म्हणजे पूजेचा शुभ मुहूर्त होय.
रामनवमीचा दिवस भक्तांसाठी खूप महत्त्वाचा आहे कारण या दिवशी विष्णूचा अवतार असलेल्या भगवान श्री रामाची पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. भक्तांच्या जीवनातून सर्व संकटे दूर होतात. या दिवशी पूजा केल्याने प्रभू श्रीरामासोबत आदिशक्तीचाही आशीर्वाद प्राप्त होतो. राम नवमीला केलेल्या व्रतामुळे माणसाच्या मनोवांच्छित इच्छा पूर्ण होतात. रामरक्षा पठणाने सर्व कष्टांचे निवारण होते, असे मानले जाते.
प्रभू श्रीरामांची प्रतिमा किंवा श्रीरामांची मूर्ती एका चौरंगावर स्थापन करावी. श्रीराम पूजनाचा संकल्प करावा. श्रीरामांचे आवाहन करून अभिषेक करावा. अभिषेकानंतर हळद-कुंकू, चंदन, फुले अर्पण करावीत. यानंतर धूप, दीप, नैवेद्य दाखवावा. आरती करावी. मनापासून नमस्कार करून श्रीरामांचे शुभाशीर्वाद घ्यावेत.
श्रीरामाच्या पूजेच्या वेळी राम चालीसा आणि रामरक्षास्तोत्र पठण करण्याची प्रथा आहे. ब्रह्म मुहूर्त पूजन केल्यावर श्रीरामाची पूजा करणे खूप शुभ आहे असे सांगितले जाते आणि रामनवमीमध्ये त्या प्रथेनुसार पूजा केली जाते. व्रताचा संकल्प केलेल्यांनी दिवसभर केवळ फलाहार करावा. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करून व्रताची सांगता करावी.
संबंधित बातम्या