Ram Mandir Pran Pratishtha Muhurat : प्रभू रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत राम मंदिर तयार झाले आहे. आता संपूर्ण देश २२ जानेवारी २०२४ ची आतुरतेने वाट पाहत आहे. या दिवशी श्री राम अयोध्येतील त्यांच्या जन्मस्थानी नव्याने बांधलेल्या मंदिरात विराजमान असतील.
२२ जानेवारीला श्री रामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पण याचे विधी आणि कार्यक्रम १६ जानेवारीपासूनच सुरू झाले आहेत. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे.
विशेष म्हणजे, ज्या मुहुर्तावर श्रीरामांच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे, तो मुहूर्त आता आणखीनच शुभ ठरत आहे. यामुळे सर्वजण आपापल्या महत्वाच्या कामांसाठी हाच मुहूर्त ठरवत आहेत. गृहप्रवेश असो किंवा वाढदिवसाचा केक कापणे असो, सर्वांना याच मुहूर्तावर आपले कार्य करायचे आहे. पण लोकांच्या या इच्छेमुळे पुजाऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. कारण एकाचवेळी सर्व ठिकाणी पोहोचणे त्यांना शक्य होणार नाही.
अयोध्येतील श्री रामांच्या मूर्तीच्या अभिषेकाचा शुभ मुहूर्त १२ वाजून २९ मिनिटे ८ सेकंद ते १२ वाजून ३० मिनिटे ३२ सेकंद असा आहे. या विशेष तिथीला सर्वार्थसिद्धी योग, अमृत सिद्धी योग, रवि योग असे अनेक शुभ योग तयार होत आहेत. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जवळपास प्रत्येक घरात सुंदरकांड आणि हवनाची तयारी सुरू आहे. सोबतच काहींना या दिवशी त्यांच्या नव्या घरात प्रवेश करायचा आहे.
तर ज्याचा वाढदिवस २२ जानेवारीला आहे, ते आपल्या वाढदिवसानिमित्त याच मुहूर्तावर हवन करण्याची योजना आखत आहेत. यासाठी त्यांनी आधीच पुजाऱ्यांची बुकिंग केली आहे. या दिवशी लग्नाची तारीखसुद्धा आहे. या दिवशी प्रदोष व्रत आहे. ज्योतिषांच्या मते त्रयोदशी तिथीला लग्न करणे खूप शुभ असते. पण आता सर्वांना एकच मुहूर्त म्हणजे श्री राम प्राणप्रतिष्ठापणाचा मुहूर्त हवा आहे. त्यामुळे पुरोहितांची कोंडी झाली आहे.
संबंधित बातम्या