Raksha Bandhan 2024 : सोमवार १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धि, रवि आणि शोभन योगात हा खास सण साजरा होत आहे. श्रावण महिन्यातील पौर्णिमा १८ ऑगस्टच्या रात्री २ वाजून २१ मिनिटांपासून सुरू होणार असून १९ ऑगस्टच्या रात्री १२ वाजून २८ मिनिटांपर्यंत चालणार आहे, मात्र भद्रा मुहूर्त असल्याने रक्षाबंधनाचा सण भद्रामध्ये साजरा होणार नाही. या दिवशी दुपारी १.२५ पर्यंत भद्रा राहील. दुपारी १ वाजून २६ मिनिटापासून ते सूर्यास्तापर्यंत रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधनाचा सण सूर्यास्तानंतरही साजरा केला जाऊ शकतो, परंतु त्यापूर्वी रक्षाबंधन साजरे करण्याचा सर्वोत्तम काळ आहे.
रक्षाबंधनाबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. धार्मिक मान्यतेनुसार रक्षाबंधनाची सुरुवात कृष्ण आणि द्रौपदीपासून झाली असे मानले जाते. भगवान श्रीकृष्णाने दुष्ट राजा शिशुपालाचा वध केला होता. युद्धादरम्यान कृष्णाच्या डाव्या हाताच्या बोटातून रक्तस्त्राव झाला होता. हे पाहून द्रौपदीला खूप दुःख झाले आणि तिने तिच्या साडीचा एक तुकडा फाडून कृष्णाच्या बोटावर बांधला, त्यामुळे त्याचा रक्तस्त्राव थांबला. तेव्हापासून कृष्णाने द्रौपदीला बहीण म्हणून स्वीकारले. वर्षांनंतर, जेव्हा पांडवांनी द्रौपदीला जुगारात हरवले, तेव्हा सर्वांसमोर तीचे वस्त्रहरण होत होते. तेव्हा कृष्णाने द्रौपदीची लाज वाचवली.
ऐतिहासिक मान्यतेनुसार, राणी कर्णावती आणि सम्राट हुमायून यांच्यात रक्षाबंधनाची सुरुवात झाली. मध्ययुगीन काळात राजपूत आणि मुस्लिम यांच्यात संघर्ष चालू होता. राणी कर्णावती ही चित्तोडच्या राजाची विधवा होती. त्या काळात गुजरातच्या सुलतान बहादूर शाहपासून स्वत:चे आणि आपल्या लोकांचे रक्षण करण्याचा कोणताही मार्ग नसल्याचे पाहून राणीने हुमायूनकडे राखी पाठवली होती. त्यानंतर हुमायूने तिचे रक्षण केले आणि तिला बहिणीचा दर्जा दिला.
ऊँ येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलः।
तेन त्वामनुबधामि रक्षे मा चल मा चल।।
राखी बांधताना भावाचे तोंड पूर्वेकडे आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे. उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधावी. धाकट्या भावाला अंगठ्याने कपाळावर खोल शिखाप्रमाणे आणि मोठ्या भावाला अनामिकेने टिळा लावावा. त्यानंतर आरती करून भावाचे तोंड गोड करावे. भावानेही आपल्या बहिणीला त्याच्या आर्थिक स्थितीनुसार किंवा क्षमतेनुसार बहिणीला भेट द्यावी.