श्रावण महिन्याच्या पौर्णिमा तिथीला नारळी पौर्णिमा साजरी करतात. रक्षाबंधन हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. यंदा १९ ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. या सणाला बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते असे म्हणतात. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि त्याची आरती करते.
रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या उजव्या हाताला राखी बांधणे शुभ मानले जाते. शास्त्रानुसार उजवा हात किंवा सरळ हात हा वर्तमान जीवनातील कर्माचा हात मानला जातो. यासोबतच उजव्या हाताने केलेले दान आणि धार्मिक कार्य देव लवकर स्वीकारतो, असेही मानले जाते. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमानंतर या हातावर कलव वगैरेही बांधले जातात.
उजव्या हाताला राखी बांधणे धार्मिक दृष्टीकोनातून शुभ मानले जाते. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही याचे अनेक फायदे आहेत. उजव्या हाताला रक्षासूत्र बांधल्याने आजारांपासून दूर राहते. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर शरीराच्या प्रमुख अवयवांपर्यंत पोहोचणाऱ्या नसा मनगटातूनच जातात. अशा स्थितीत या ठिकाणी रक्षासूत्र किंवा राखी बांधल्याने व्यक्तीचा रक्तदाब योग्य राहतो आणि व्यक्तीचा वात, पित्त आणि कफ संतुलित राहतो.
१. येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वाम् अभिबध्नामि रक्षे मा चल मा चल॥
२. “सिन्दूरं सौभाग्य वर्धनम, पवित्रम् पाप नाशनम्। आपदं हरते नित्यं, लक्ष्मीस्तिष्ठति सर्वदा॥
रक्षाबंधन संपल्यानंतर अनेक लोक हातातली राखी काढून टाकतात. परंतु राखी काढत असताना अनेकदा ती तुटते. अशा वेळी तुटलेल्या राखीला कुठेही टाकणं अशुभ मानलं जातं. त्यासाठी तुटलेल्या राखीला एका नाण्यासोबत बांधून एखाद्या झाडाखाली ठेवायला हवं. तसेच तुटलेल्या राखीला नाण्यासह गंगेत प्रवाहित करणंही अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळं रक्षाबंधन संपल्यानंतर बहिणीने बांधलेल्या राखीला इकडेतिकडे न टाकता जपून ठेवत पुढच्या वर्षी गंगेत टाकायला हवं. राखी तुटल्यास तिला नाण्यासह झाडाखाली ठेवण्याचा सल्ला धर्मशास्त्रात देण्यात आला आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)