Shukra Pradosh Vrat 2024 : प्रदोष व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. भगवान शिवाला समर्पित प्रदोष व्रत केल्याने जीवनात आर्थिक समृद्धी आणि आनंद मिळतो. भगवान शंकराच्या आशीर्वादाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. प्रत्येक महिन्याला दोन प्रदोष व्रत केले जातात, एक कृष्ण पक्षात आणि एक शुक्ल पक्षात. अशा प्रकारे वर्षभरात एकूण २४ प्रदोष व्रत केले जातात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाचा प्रदोष व्रत १९ जुलै २०२४ रोजी आहे. १९ जुलैला शुक्रवार आहे, त्यामुळे शुक्र प्रदोष व्रताचा योगायोग आहे.
आषाढ महिन्याची शुक्ल त्रयोदशी १८ जुलै रोजी रात्री ८ वाजून ४४ मिनिटांनी सुरू होईल आणि १९ जुलै रोजी रात्री ०७ वाजून ४१ मिनिटांनी समाप्त होईल. प्रदोष व्रत हे प्रदोष काळी म्हणजेच संध्याकाळी दिवेलागणीला केले जात असल्यामुळे १९ जुलै रोजी हे व्रत करावे.
या दिवशी अनेक शुभ योग-संयोग जुळून येत आहेत. शुक्र प्रदोष तिथीला रवियोग, ऐंद्र योग, लक्ष्मी नारायण योग असे शुभ योग तयार होत आहेत. या शुभ संयोगामध्ये महादेव आणि माता पार्वतीचे पूजन करणे पुण्य फलदायी असते असे सांगितले जाते.
प्रदोष व्रतामध्ये प्रदोष काळात भगवान शिवाची पूजा करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. या वेळी पूजा केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात, असे म्हटले जाते. प्रदोष काळ संध्याकाळी सूर्यास्ताच्या ४५ मिनिटे आधी सुरू होतो.
धार्मिक मान्यतेनुसार प्रदोष व्रत केल्याने संततीचे सुख प्राप्त होते. भगवान शंकर आणि माता पार्वतीचा आशीर्वाद मिळतो. सुख-समृद्धी लाभते. हे व्रत अतिशय शुभ मानले जाते आणि शिवकृपा देते. यामुळे व्यक्तीला आरोग्य, पुण्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी इत्यादींचा आशीर्वाद मिळतो.
सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. आंघोळ केल्यानंतर स्वच्छ कपडे घाला. देवघर स्वच्छ करून देवांची पूजा करा, देवघरात दिवा लावावा. भगवान भोलेनाथांना गंगाजलाने अभिषेक करा. भगवान भोलेनाथांना फुले अर्पण करा. या दिवशी महादेवासोबतच देवी पार्वती आणि गणेशाचीही पूजा करा. भगवान शंकराची आरती करावी. या दिवशी जास्तीत जास्त देवाचे ध्यान करावे.
या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्यासाठी उपवास केला जातो. दिवसभर व्रत पाळल्यानंतर प्रदोष काळात संध्याकाळी पुन्हा शिवशंकर आणि माता पार्वतीची पूजा विधीनुसार करावी.
संबंधित बातम्या