आगामी विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षाचे उमेदवार २४ ऑक्टोबर रोजी गुरुपुष्यमृत योगावर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अनेक इच्छुकांनी आपली कागदपत्रे आधीच तयार केली असून उमेदवारीच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत. गुरुपुष्यामृत योगाला एखादा संकल्प करणे शुभ मानले गेले असून या दिवशी केलेले कार्य सफल होते अशी मान्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील मेळाव्यात गुरुपुष्यमृतनिमित्त उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली आहे. या बरोबरच राजापूर विधानसभा मतदार संघाचे तीन वेळा आमदार राहिलेले शिवसेना नेते राजन साळवी यांनीही पक्षाध्यक्षांनी आम्हाला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली आहे. मी २४ ऑक्टोबरला कागदपत्रे सादर करण्याच्या तयारीत आहे, असे म्हटले आहे.
त्याच दिवशी आदित्य ठाकरे देखील उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती शिवसेनेच्या नेत्यांनी दिली.
कसबा पेठेतील दावेदार आणि दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे प्रमुख नेते हेमंत रासे यांनीही याच मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा संकल्प केला आहे. मी सध्या पक्षाकडून माझ्या उमेदवारीच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
या बरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि इतरही पक्षांच्या अनेक नेत्यांनी याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा संकल्प केला आहे.
पुष्य नक्षत्र गुरुवारी असल्यास त्या तिथीला गुरुपुष्यामृत योग असे म्हटले जाते. या तिथीला गुरुवार आणि पुष्यनक्षत्र यांचा योग होतो, म्हणून या तिथीला गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात. पुष्यामृत गुरुवारी येणे हा दुर्मिळ योग मानला गेला आहे. म्हणूनच त्याला अमृतयोग मानले गेले आहे. भारतीय संस्कृतीपत हा योग सर्वात शुभ योग असल्याचे म्हटले गेले आहे. पुष्य नक्षत्रात प्रत्येक क्षण शुभ असतो.
गुरुपुष्यामृत योग साधून केलेली धार्मिक कार्ये उत्तम मानली गेली आहेत. पुष्य नक्षत्र हे सर्वप्रकारच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. गुरुपुष्य योग दिवशी गुरुमंत्र घेणे उत्तम म्हटलेले आहे. गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्र-तंत्र, संकल्प, साधना आणि जप करण्यासाठी अत्यंत उत्तम असल्याचे म्हटले गेले आहे.
पोषण करणारा, शक्ती देणारा किंवा ऊर्जा देणारा असा पुष्य या शब्दाचा अर्थ सांगितला जातो. पुष्य म्हणजे शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा असाही अर्थ होतो. पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी मानले गेले आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा, असे म्हटलेले आहे. शनी ग्रह हा पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह आहे.
पुष्याला नक्षत्राचा राजा म्हटलेले आहे. म्हणूनच या योगात केलेली खरेदी फलदायी मानली गेली आहे. हा योग शुभ असतो. या तिथीला केलेली खरेदी टिकणारी असते. यावेळी सोने, चांदी, जमीन, भवन, वाहन, आभूषण यांची खरेदी करणे अत्यंत शुभ असल्याचे मानले गेले आहे.
संबंधित बातम्या