PM नरेंद्र मोदी ५ फेब्रुवारी रोजी कुंभमेळ्यात करणार स्नान; दिल्ली मतदानाचा दिवसच का निवडला, कॉंग्रेसचा सवाल
मराठी बातम्या  /  धर्म  /  PM नरेंद्र मोदी ५ फेब्रुवारी रोजी कुंभमेळ्यात करणार स्नान; दिल्ली मतदानाचा दिवसच का निवडला, कॉंग्रेसचा सवाल

PM नरेंद्र मोदी ५ फेब्रुवारी रोजी कुंभमेळ्यात करणार स्नान; दिल्ली मतदानाचा दिवसच का निवडला, कॉंग्रेसचा सवाल

Haaris Shaikh HT Marathi
Feb 04, 2025 10:10 PM IST

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात गंगेकिनारी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी स्नान करणार आहे. नेमक्या दिल्ली विधानसभेच्या मतदानाच्या दिवशी कुंभ स्नान करत असल्याने कॉंग्रेस नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ फेब्रुवारी रोजी कुंभमेळ्यात स्नान करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ फेब्रुवारी रोजी कुंभमेळ्यात स्नान करणार (PTI)

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी, ५ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील महाकुंभला भेट देणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान गंगा आणि यमुनेच्या संगमावर स्नान आणि गंगा आरती करणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी सुमारे अडीच तास प्रयागराजमध्ये राहणार आहेत. कुंभमेळ्याचे व्यवस्थापन पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान त्यांच्या आधीच्या प्रोटोकॉलशीटनुसार नेत्रकुंभ आणि राज्याच्या मंडपाला भेट देणार नाहीत. मोदी सकाळी १० वाजता बमरौली विमानतळावर दाखल होतील. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता हेलिकॉप्टरने डीपीएस हेलिपॅडवर पोहोचतील.

पंतप्रधान मोदी अरैल घाटातून बोटीने संगमाकडे रवाना होतील आणि सकाळी ११ वाजता तेथे पोहोचतील. तेथे कुंभमेळ्यात पवित्र स्नान केल्यानंतर सकाळी ११.४५ वाजता मोदी अरैल घाटावर परततील. दुपारी १२ वाजता हेलिकॉप्टरने बमरौली विमानतळाकडे रवाना होतील. दुपारी १२.३० वाजता हवाई दलाच्या विमानाने दिल्लीला परततील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ साली प्रयागराजमध्ये झालेल्या कुंभमेळ्यात गंगे नदीत स्नान केले होते. शिवाय पाच सफाई कामगारांचे पाय धुतले होते. गेल्या वर्षी १३ डिसेंबर रोजी प्रयागराज दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५५०० कोटी रुपयांच्या १६७ विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले होते.

कुंभमेळ्यात जाऊन PM मोदींचा इव्हेंट- कॉंग्रेस नेते प्रमोद तिवारी 

पंतप्रधान मोदी कुंभमेळ्यात जाऊन काहीतरी इव्हेंट नक्की करतील, असं आम्हाला आधीपासून वाटत होतं. नेमक्या दिल्लीतील विधानसभा मतदानाच्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी का जात आहेत, असा प्रश्न कॉंग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी केला आहे. मतदारांना प्रभावित करण्याचा हा प्रयत्न तर नाही, असं तिवारी म्हणाले. 

कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीत मृत पावलेल्या यात्रेकरूंच्या कुटुंबीयांना मोदींनी भेटावे

नरेंद्र मोदी यांनी  कुंभमेळ्यात स्नान जरुर करावे. परंतु कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत मृत पावलेल्या यात्रेकरूंच्या कुटुंबीयांची मोदींनी भेट घ्यावी, असं समाजवादी पार्टीचे नेते, खासदार रामगोपाल यादव यांनी म्हटलं आहे. सर्वसामान्य जनता गंगेत बुडाली काय, चेंगराचेंगरीत मेली काय याच्याशी मोदींना काही देणंघेणं नाही.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धार्मिक आस्थेने कुंभमेळ्यात जाऊन स्नान केलं असतं तर चांगलं झालं असतं. परंतु त्यांचा हेतु राजकीय आहे. राजकारणाचा दिल्लीच्या मतदानाच्या दिवशी कुंभमेळ्यात जाऊन स्नान करण्यामागे त्यांचा राजकीय हेतु दिसून येतो, हे दुःखद असल्याची प्रतिक्रिया शिवसेना (उबाठा)च्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली आहे.

Whats_app_banner