Iskcon Temple Kharghar Navi Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मुंबई भेटी दरम्यान आशियातील दुसऱ्या क्रमांकाच्या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन केले. खारघर, नवी मुंबई येथे हे मंदिर बांधण्यात आले आहे. इस्कॉनचे हे पहिले मंदिर आहे ज्यात संस्थापक स्वामी श्रील प्रभुपाद यांचे स्मारक असेल. या मंदिराला श्री श्री राधा मदनमोहन जी मंदिर असे नाव देण्यात आले आहे. हे मंदिर १२ वर्षात पूर्ण झाले. एकूण ९ एकरावर हे मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी सुमारे २०० कोटी रुपये खर्च आला असल्याचे सांगण्यात येत आहे.
सिडकोने या मंदिरासाठी जागा उपलब्ध केली होती. इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्सियसन्स ( इस्कॉन ) या भगवतगीतेचा प्रसार करणाऱ्या संस्थेने या मंदिराची उभारणी केली आहे. जगभरात सुमारे ८०० इस्कॉन मंदिरे आहेत, परंतु नवी मुंबईतील हे एकमेव मंदिर असेल जिथे इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद यांचे स्मारक बांधण्यात आले आहे.
९ एकरात पसरलेले हे मंदिर भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे.
त्याची भव्यता आणि स्थापत्यकलेसाठी ते विशेष चर्चेत आहे.
पांढऱ्या-तपकिरी संगमरवरी बनवलेल्या मंदिराचे सौंदर्य मन मोहून टाकणारे आहे.
चांदीच्या दरवाजांवर गदा, शंख, चक्र आणि ध्वज कोरलेले आहेत.
मुख्य खोलीत कृष्णाची थ्रीडी पेंटिंग्ज आणि दशावताराच्या कलाकृती आहेत.
मंदिर परिसरामध्ये ५-६ एकर हिरवळ अधिकच आकर्षक दिसत आहे.
दशावतार मंदिराच्या समोर विशाल बाग असून त्यात कारंजात विद्युत रोषणाई केलेली आहे.
मुख्यमंदिर आणि त्याच्या छतावर कलाकृसर केली असून पांढरा, सोनेरी आणि गुलाबी रंगाचा वापर केला आहे.
नौकानयनसाठी भव्य तलावाची निर्मिती केली असून भक्तांना बोटींगचा आनंद घेता येणार आहे.
आंतरराष्ट्रीय गेस्ट हाऊस – येथे देश- विदेशातून आलेल्या भक्तांना राहाता येणार आहे.
नवी मुंबईचे हे मंदिर म्हणजे भक्ती, संस्कृती आणि वास्तुकला यांचा संगम आहे. २०० कोटी रुपये खर्चून बांधलेले हे मंदिर केवळ आशियातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिर नाही तर भारतीय परंपरांचे भव्य प्रतीक आहे. १६ जानेवारीपासून भाविकांना येथे दर्शन घेता येणार आहे. या मंदिराला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळणार आहे. जगात सुमारे ८०० इस्कॉन मंदिरे आहेत, त्यापैकी काही खूप प्रसिद्ध आहेत.
संबंधित बातम्या