Pitru Paksha : पितृ पक्षाच्या काळात व्यक्तीने आपल्या पितरांच्या मोक्ष आणि समाधानासाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंड दान करावे. असे मानले जाते की, असे केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि कुटुंबात वृद्धी होते. पितृपक्षात पितरांना तर्पण, श्राद्ध, पिंड दान अर्पण केल्याने दिवंगत पितरांना समाधान मिळते आणि परिणामी ते आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात.
असे मानले जाते की, पितृ पक्षाच्या काळात सर्व पितर पृथ्वीवर राहतात आणि त्यांना आशा असते की त्यांच्या कुळातील वंशजांनी त्यांच्या नावाने श्राद्ध, पिंड दान आणि तर्पण करावे जेणेकरून त्यांना मोक्ष मिळेल. यावर्षी पितृ पक्ष १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत चालेल.
पितृ पंधरवडा पद्धतीनुसार तिथीनुसार तर्पण करण्याचा नियम आहे. चुकून किंवा तिथी न कळल्यास अमावस्या तिथीला नैवेद्य दाखवता येईल. तर्पण श्राद्धाशी संबंधित घटना महाभारताच्या १३ व्या अध्यायात आहे.
कथा अशी की, जरत्कारु ऋषी ब्रह्मचारी जीवन जगत असताना जंगलात तपश्चर्या करत होते. एके दिवशी संध्याकाळी ऋषी जंगलात फिरत असताना त्यांनी काही पूर्वजांना झाडावर उलटे लटकलेले पाहिले तेव्हा ऋषींनी त्या पितरांकडे जाऊन विचारले, तुम्ही कोण आहात आणि असे उलटे का लटकत आहेत? तुम्हा सर्वांना मुक्त करण्याचा उपाय काय? याचे कारण सांगा. तेव्हा पूर्वजांनी सांगितले की, आमच्या कुटुंबातील वंश संपल्यामुळे पितृपक्षात आम्हाला सर्वांना तर्पण, श्राद्ध, पिंड दान देऊ शकेल असा कोणीही उरला नाही जेणेकरून आम्हाला मोक्ष मिळेल.
पूर्वजांनी ऋषींना सांगितले की, आमच्या कुटुंबात एक व्यक्ती शिल्लक आहे ज्याचे नाव जरत्कारु आहे आणि तो देखील ब्रह्मचारी जीवन जगत आहे. हे ऐकून जरत्कारु ऋषींना खूप वाईट वाटले आणि ते म्हणाले की तो दुर्दैवी जरत्कारु ऋषी मीच आहे. हे ऐकून सर्व पूर्वज आनंदी झाले आणि म्हणाले की, तुला भेटणे हे मोठे भाग्य आहे. आम्हाला सर्वांना मोक्ष आणि तृप्ति मिळवून द्यायची असेल तर लवकरात लवकर लग्न करून आपल्या कुटुंबात वंशवृद्धी कर आणि पितृ पक्षाच्या दिवशी मृत पितरांच्या नावाने श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण कर. जेणेकरून प्रत्येकाला मोक्ष मिळू शकेल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)