सध्या पितृ पक्ष सुरू आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर पितृ पंधरवडा राहील. पितृ पक्षातील सर्व दिवस महत्त्वाचे आहेत, कारण या कालावधीतील प्रत्येक तिथीला विविध पितरांची श्राद्ध विधी केली जाते, भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष हा पितरांना समर्पित पंधरवडा आहे.
या संपूर्ण पितृ पंधरवड्यामध्ये तिथीनुसार पितरांचे श्राद्ध व पिंडदान, तर्पण वगैरे केले जातात. पितृ पंधरवड्याच्या नवव्या दिवशी अविधवा नवमी साजरी केली जाते. या दिवसाला नवमी श्राद्ध असेही म्हणतात. या वर्षी मातृ नवमी कधी आहे, अविधवा नवमीचे महत्व आणि या दिवशी कोणाचे श्राद्ध केले जाते ते जाणून घेऊया.
अविधवा नवमी कधी आहे?
भाद्रपद कृष्ण पक्ष नवमी (२५ सप्टेंबर ३२०२४, बुधवार) दुपारी १२ वाजून १० मिमिटापासून सुरू होईल. तर अश्विन कृष्ण पक्ष नवमी (२६ सप्टेंबर २०२४, गुरुवार) दुपारी १२ वाजून २५ मिनिटापर्यंत राहील.
उदया तिथीनुसार २६ सप्टेंबर २०२४ रोजी मातृ नवमी साजरी केली जाईल. परंतू, तारखेच्या बदलामुळे, २५ सप्टेंबर २०२४ रोजी अविधवा/मातृ नवमी साजरी करतील.
अविधवा नवमीला कोणाचे श्राद्ध करतात
मुख्यतः हे श्राद्ध सून तिच्या मृत सासूसाठी करते. याला सौभाग्यवती श्राद्ध असेही म्हणतात. गरुड पुराणानुसार, श्राद्ध पंधरवड्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे नवमी तिथी, याला अविधवा नवमी, मातृ नवमी असे म्हणतात. गरुड पुराणानुसार या दिवशी माता, बहिणी आणि मुलींचे श्राद्ध केले जाते. या पुराणात मातृ नवमीच्या दिवशी श्राद्ध फक्त स्त्री पितरांचेच केले जाते असा उल्लेख आहे. विधीनुसार श्राद्ध केल्याने मृत महिलांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि घरात सुख-समृद्धी येते.
अविधवा नवमी श्राद्ध विधी
अविधवा नवमीला स्नान आणि ध्यानानंतर तर्पण आणि पिंड दान इत्यादी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी केले जातात. या दिवशी मृत विवाहित महिला, सुना, मुली इत्यादींचे श्राद्ध केले जाते. घराच्या मुख्य अंगणात दक्षिण दिशेला हिरव्या रंगाचे कापड पसरावे. पूर्वजांचा फोटो ठेवा. फोटोसमोर फुले अर्पण करा. तिळाच्या तेलाचा दिवा आणि सुगंधी धूप लावा.
आता स्वच्छ पाण्यात तीळ आणि खडीसाखर मिसळा. हे पाणी तळहातात घ्या आणि अंगठ्याच्या बाजूने स्त्री पितरांचे ध्यान करून अर्पण करा. आता तूप, खीर-पुरी आणि गूळ वगैरे अर्पण करा. पूजेच्या वेळी जाणूनबुजून किंवा नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागावी. या दिवशी विवाहित महिलांना अन्नदान करण्याची परंपरा आहे. जेवन झाल्यानंतर सर्व विवाहित महिलांना सौभाग्याच्या वस्तू दान करा आणि दक्षिणा देऊन आशीर्वाद घ्या.