Pithori Amavasya Katha : ब्राह्मणाच्या सुनेसोबत नेमकं काय घडलं? वाचा पिठोरी अमावस्येची संपूर्ण कथा-pithori amavasya 2024 story in marathi puja padhat and katha ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Pithori Amavasya Katha : ब्राह्मणाच्या सुनेसोबत नेमकं काय घडलं? वाचा पिठोरी अमावस्येची संपूर्ण कथा

Pithori Amavasya Katha : ब्राह्मणाच्या सुनेसोबत नेमकं काय घडलं? वाचा पिठोरी अमावस्येची संपूर्ण कथा

Sep 02, 2024 01:05 PM IST

Pithori Amavasya Katha : पिठोरी अमावस्येला पिठाचेच सर्व पदार्थ करतात, त्यावरून या तिथीला पिठोरी अमावास्या असे नाव पडले असावे. पिठोरी अमावस्येची संपूर्ण पूजा करून ही कथा वाचावी.

पिठोरी अमावस्या कथा
पिठोरी अमावस्या कथा

आज २ सप्टेंबर सोमवार रोजी, पिठोरी अमावस्या आहे. श्रावण अमावास्येच्या दिवशी दिवसभर उपवास करावा. सायंकाळी स्नान करून सर्वतोभद्र मंडलावर आठ कलश स्थापावे. तांदुळाच्या राशीवर चौसष्ट सुपार्‍या मांडून त्यावर चौसष्ट योगिनीचे आवाहन करावे. त्यांची षोडशोपचारे पूजा करावी. नंतर व्रतासाठी केलेले पक्वान्न डोक्यावर घेऊन 'कोणी अतिथी आहे काय? असा प्रश्न विचारावा. मुलांनी 'मी आहे' असे म्हणून ते पक्वान्न मागच्या बाजूने काढून घ्यावे.

पूर्वी पूजेच्या मूर्ती पिठाच्या करीत. अलिकडे त्यांची छापील चित्रे मिळतात. या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करतात. त्यावरून या तिथीला पिठोरी अमावास्या असे नाव पडले असावे. पिठोरी अमावस्येची संपूर्ण पूजा करून ही कथा वाचावी. 

पिठोरी अमावस्या कथा

आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई ? ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याचे वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाई. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असे सहा वर्षे झाले. सातव्या वर्षीही तसंच झालं, तेव्हा सासरा रागावला. ते मेलेले पोर तिच्या ओटीत घातले. तिला रानात हाकलून लावलं. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई, तू कोणाची कोण? इथे येण्याचे कारण काय ? आलीस तशी लवकर जा. नाही तर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील !

तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, त्या करताच मी इथे आले आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई, तू इतकी जिवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली आणि इथे येण्याचे कारण सांगितले. सासऱ्यांनी घरातून घालवून दिले तर आता जगून तरी काय करायचे आहे? असं म्हणून रडू लागली.

तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई तू भिऊ नको, घाबरू नको. अशीच थोडी पुढं जा. तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल, तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, साती अप्सरा तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असे झाल्यावर मी आहे म्हणून सांग. त्या तुला पाहतील. कोण, कोठची म्हणून चौकशी करतील. तेव्हा सगळी हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणाच्या सुनेने बरं म्हटलं. तिथून उठली, पुढं गेली. तो एक बेलाचे झाड पाहिलं. तिथेच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र झाली. तशी नागकन्या, देवकन्या आणि सात अप्सरांच्या स्वार्‍यासुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे? म्हणून विचारलं.

ते ऐकताच तीने मी आहे म्हणून सांगितले. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिलं. त्यांना आश्चर्य वाटलं. तिची कोण, कोठली म्हणून चौकशी केली. तिनं सर्व हकीकत सांगितली. नागकन्या- देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. पुढे तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं. तिला श्रावणी अवसेचं हे व्रत सांगितलं. चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्युलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं. तसे तिने विचारलं, ह्याने काय होतं ? अप्सरांनी सांगितलं. हे व्रत केले म्हणजे मुलबाळ दगावत नाहीत, सुखासमाधानात राहतात. पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली.

ती आपल्या गावात आली. लोकांनी हिला पाहिलं, ब्राह्मणाला जाऊन सांगितले. भटजी भटजी, तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्ध घटकेनं पाहू लागला, तो मुलबाळं दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला, मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुऊन घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिनं ती सारी सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुला-बाळांसहित सुखाने ती नांदू लागली. आणि प्रत्येक वर्षी पिठोरी अमावस्येचे व्रत करू लागली. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

विभाग