प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीला अमावस्या म्हणतात. प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक महिन्यातील अमावस्येला एका विशिष्ट नावाने संबोधले जाते, ज्याचे खास महत्व असते. श्रावण महिन्यातील अमावस्या तिथीला पिठोरी अमावस्या म्हणतात, तसेच या दिवशी बैलपोळा सण देखील साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात बळीराज्याचा सोबती मित्र बैलाची विशेष पूजा केली जाते. या अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते.
पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात. संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी व्रत-पूजा करतात. पितरांना तर्पणसोबतच ही तिथी धनदेवतेच्या पूजेसाठीही अत्यंत फलदायी मानली जाते. पिठोरी अमावस्याचे धार्मिक महत्त्व तारीख, पूजाविधी आणि मुहूर्त याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
पंचांगानुसार या वर्षी श्रावण महिन्यातील अमावस्या उदया तिथीनुसार २ सप्टेंबर २०२४ रोजी येणार आहे. पंचांगानुसार, श्रावण महिन्याची अमावस्या २ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजून ४८ मिनिटापासून सुरू होईल, २ सप्टेंबरला अहोरात्र ही तिथी राहील आणि ३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजून २४ मिनिटांनी समाप्त होईल.
पिठोरी अमावस्येच्या दिवशी पिठाची आकृती बनवून दुर्गादेवीसह ६४ देवींची पूजा करण्याची परंपरा आहे. यामुळे याला पिठोरी अमावस्या असे संबोधण्यात येत असावे. या दिवशी पूजा, जप आणि तपश्चर्या सोबतच स्नान आणि दान करणे खूप महत्वाचे मानले जाते.
हे व्रत सुवासिनी स्त्रिया करतात. या दिवशी उपवास करुन सायंकाळी स्नान करतात. चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. या दिवशी खीर-पुरी, पुरणपोळी, साटोरी, असे पदार्थ तयार करतात. व्रत पूर्ण केले महणजे अखंड सौभाग्य व दीर्घायु अपत्य होतात. पिठोरी अमावास्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. या दिवशी सायंकाळी आठ कलश स्थापित केले जातात. त्यावर पूर्णपात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदुळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतो.
पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी आर्वजून व्रत करतात. धन देवतांच्या पूजेसह संततीची इच्छा असणारे देखील या दिवशी आवर्जून व्रत करतात. आईनं मुलांसाठी करायचं हे व्रत आहे. कदाचित म्हणूनच या दिवसाला मातृदिन असंही म्हटलं जातं.
भाद्रपद महिन्यात येणारी अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते. हिंदू मान्यतेनुसार, भाद्रपद महिन्यातील या अमावास्येला मुलांच्या सुखासाठी आणि सौभाग्यासाठी पितरांची पूजा केली जाते, तसेच दुर्गा देवीची पूजा करण्याची परंपरा आहे.