पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असलेल्या एका जुन्या हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. या जीर्णोद्धारासाठी पाकिस्तान सरकारने १ कोटी पाकिस्तानी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे.
पाकिस्तानात अनेक जुनी हिंदू मंदिरे आहेत. काही मंदिरांची अवस्था मोडकळीस आलेली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नरोवाल जिल्ह्यातील जफरवाल तालुक्यात बाओली साहिब हिंदू मंदिर आहे. हे मंदिर गेले ६४ वर्ष बंद होतं. या भागात दीड हजार हिंदू कुटुंबीय राहतात. त्यांना पूजाअर्चा करण्यासाठी परिसरात मोठं मंदिर नव्हतं. अनेकजण सियालकोट आणि लाहोर येथील हिंदू मंदिरात जात होते. 'पाकिस्तान धर्मस्थान कमिटी’ने या मंदिराच्या जीर्णोद्वाराची मागणी केली होती. आता पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांच्या प्रार्थनास्थळाची देखरेख करणाऱ्या 'इव्हॅक्यू ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्ड' या केंद्रीय संस्थेने जफरवाल येथील बाओली साहिब मंदिर ताब्यात घेऊन मंदिराचा जार्णोद्धार सुरू केला आहे. जीर्णोद्धाराअंतर्गत मुख्य मंदिराचे बांधकाम आणि मंदिर परिसराच्या २१,६०० चौरस फूट जागेवर संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. या भागातील हिंदू बांधवांना धार्मिक विधीसाठी लवकरच हे मंदिर उपलब्ध होणार आहे. मंदिराचे जीर्णोद्धार पूर्ण झाल्यानंतर हे मंदिर ‘पाकिस्तान धर्मस्थान कमिटी’ या संस्थेकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात नरोवाल जिल्ह्यात जफरवाल या तालुक्याच्या ठिकाणी रावी नदीच्या किनारी १९ व्या शतकाच्या पूर्वार्धात हे मंदिर बांधण्यात आले होते. या जिल्ह्यात छोटी-मोठी अशी एकूण ४५ हिंदू मंदिरे आहेत. परंतु ती सर्व मंदिरे दुरूस्तीअभावी मोडकळीस आली आहेत. बाओली साहिब हिंदू मंदिराच्या इमारत जीर्ण झाल्यानंतर १९६० पासून हे मंदिर बंद करण्यात आले होते. 'पाकिस्तान धर्मस्थान कमिटी’चे माजी अध्यक्ष रतनलाल आर्य हे गेली २० वर्ष या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पाठपुरावा करत होते. या कामात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाद्वारे गठीत एक सदस्यीय आयोगाचे प्रमुख शोएब सिद्दल आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य मंजूर मसिह यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.
बाओली साहिब हिंदू मंदिराचा जीर्णोद्धार केल्याबद्दल पाकिस्तान धर्मस्थान कमिटीचे विद्यमान अध्यक्ष सावन चंद यांनी पाकिस्तान सरकारचे आभार मानले आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धाराची दीर्घकाळापासून मागणी होत होती. आता परिसरातील हिंदुंना धार्मिक विधीसाठी लवकरच मंदिर खुले केले जाणार असल्याचे चंद म्हणाले.