ज्येष्ठ शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही निर्जला एकादशी, भीमसेनी एकादशी किंवा भीम एकादशी म्हणून ओळखली जाते. या एकादशीचे व्रत केल्याने वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी व्रतांचे लाभ व पुण्य प्राप्त होते. त्यामुळे सर्व एकादशी तिथींमध्ये निर्जला एकादशी सर्वात महत्त्वाची मानली जाते.
एकादशी तिथी भगवान विष्णूच्या पूजेला समर्पित आहे. यावेळचे निर्जला एकादशीचे व्रत अनेक अर्थाने विशेष असणार आहे. कारण या दिवशी अनेक शुभ योग तयार होणार आहेत. या शुभ योगांमध्ये उपासना आणि उपवास केल्याने फायदा होतो. या वर्षी ज्येष्ठ महिन्यातील निर्जला एकादशीचे व्रत (मंगळवार) १८ जून २०२४ रोजी पाळले जाणार आहे.
वास्तविक, वर्षात २६ एकादशी तिथी येतात. पण निर्जला एकादशी ही सर्वात कठोर व्रत मानले जाते. कारण यामध्ये एकादशीच्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत अन्न व पाणी सेवन करण्यास वर्ज्य आहे.
यावर्षी निर्जला एकादशीची तारीख विशेष असणार आहे. कारण व्रतासह पारणाच्या दिवशीही अनेक शुभ योग तयार होत आहेत. निर्जला एकादशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग, शिवयोग आणि स्वाती नक्षत्र असेल.
त्रिपुष्कर योग: १८ जून दुपारी ३:५६ ते दुसऱ्या दिवशी (१९जून) सकाळी ५:२४ पर्यंत
शिवयोग : सकाळपासून रात्री ९.३९ पर्यंत.
स्वाती नक्षत्र : दुपारी ३.५६ पर्यंत.
उपवासासोबतच या वर्षी निर्जला एकादशीच्या दिवशीही शुभ योग येणार आहे. १९ जून रोजी सकाळी निर्जला एकादशीच्या पारणात सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि अमृत सिद्धी योग तयार होतील. या शुभ योगांमध्ये पारण केल्याने व्रत सफल होते आणि अक्षय पुण्य प्राप्त होते.
उष्णतेची तीव्र लाट असताना ज्येष्ठ महिन्यात निर्जला एकादशीचे व्रत केले जाते. त्यामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्वासोबतच ही एकादशी जीवनातील पाण्याचे महत्त्वही सांगते. पौराणिक कथेनुसार, महर्षी वेद व्यासांच्या सांगण्यावरून महाभारतातील योद्धा भीम यांनीही हे व्रत पाळले होते. तेव्हापासून या एकादशीला भीमसेनी एकादशी असे नाव पडले.
काही कारणास्तव एकादशीचे व्रत वर्षभर पाळणे झाले नाही तर केवळ निर्जला एकादशीचे व्रत केल्याने सर्व एकादशी व्रताचे फळ मिळते.
निर्जला एकादशीचे व्रत केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते आणि घरात धन-धान्याची कमतरता भासत नाही. तसेच जीवन संकटांपासून मुक्त राहते.
हे व्रत दीर्घायुष्य आणि मोक्षप्राप्तीसाठी फलदायी मानले जाते. भीमसेनने मोक्षप्राप्तीसाठी निर्जला एकादशीचे व्रतही केले.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती धार्मिक मान्यतांवर आधारित आहे. ती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे, असा हिंदुस्तान टाइम्स मराठीचा दावा नाही. त्यामुळं अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.)