शारदीय नवरात्रोत्सव ३ ऑक्टोबर म्हणजे येत्या गुरुवारपासून सुरू होत आहे. आश्विन महिन्यातील शुल्क प्रतिपदेला शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात होते. यंदा नवरात्री ३ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. तसेच, १२ ऑक्टोबर रोजी दसरा सण साजरा होईल.
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दूर्गा देवीची पूजा केली जाते. देशभरात हे नऊ दिवस अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले जातात. पहिल्याच दिवशी घटस्थापना केली जाते. यावेळी घरोघरी घट बसविले जातात. यामध्ये गहू किंवा सप्तधान्य पेरले जाते.
हिंदू धर्मात नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना करून गहू किंवा जव पेरण्याचा विधी आहे. घटस्थापनेला गहू पेरल्याने घरात सुख-समृद्धी येते, असे मानले जाते. जाणून घ्या नवरात्रीत गहू, जव किंवा सप्तधान्य का पेरतात आणि पेरण्याची पद्धत-
पूजेच्या ठिकाणी दुर्गेच्या मूर्तीसमोर मातीच्या भांड्यात गहू, जव किंवा सप्तधान्य पेरले जातात. हे धान्य नऊ दिवसांत हिरवे होते त्याला पालवी फुटते, जी सुख-समृद्धी दर्शवतात. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, नवरात्रीच्या काळात गहूची पेरणी केली जाते कारण शास्त्रांमध्ये गहू हे सृष्टीच्या प्रारंभानंतरचे पहिले पीक मानले जाते. जव किंवा गहू अन्न आहे आणि अन्नाला हिंदूशास्त्रात ब्रम्ह देवतेचा मान दिला जातो. यामुळे नवरात्रीत याची पूजा केली जाते. त्यामुळे देवी-देवतांच्या पूजेमध्ये गहू, जव पेरणे शुभ मानले जाते.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना करताना मातीचे भांडे किंवा छोटे मडके घ्या. स्वच्छ पाण्याने ते पूर्णपणे स्वच्छ करा.
मातीच्या भांड्यात कुंकवाचे स्वस्तिक बनवा आणि त्यात माती आणि कोरडे शेणखत घाला.
माती ओलसर करण्यासाठी पाणी फवारणी करा.
आता एका वाडग्यात किंवा भांड्यात गहूचे, जवाचे किंवा सप्तधान्याचे दाणे ठेवा.
आता हे दाणे हाताने भांड्यात पसरवा.
नवरात्रीत पेरलेले सप्तधान्य, जव किंवा गहू यांची जितकी चांगली वाढ होते तितका जास्त देवीचा कृपाशिर्वाद तुमच्यावर राहतो. यामुळे व्यक्तिच्या घरात सुख समृद्धी राहील असा संकेत मिळतो, असे सांगितले जाते. मान्यतेनुसार, जर कोंब २ ते ३ दिवसात फुटले तर खुपच शुभ असते आणि नवरात्री समाप्तीपर्यंत जव जगलेच नाही तर हे अशुभ मानले जाते. असेही होऊ शकते की, तुम्ही योग्य पद्धतीने जव किंवा गहू पेरले नसावेत. यामुळे लक्षात ठेवा की, सप्तधान्य, जव किंवा गहू पेरतांना योग्य पद्धतीने पेरावेत.