गुरुवार ३ ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत भगवती देवीच्या मंदिरामध्ये भक्तांची गर्दी होऊ लागली आहे. कटरा येथील वैष्णोदेवीच्या दरबारात नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी गर्दी झाली आहे. गुरुवारी सकाळी कटरा रेल्वे स्थानकावर भाविकांची एवढी मोठी गर्दी दिसून आली की, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. देवीचा दरबार आकर्षक फळे आणि फुलांनी सजवला आहे.
माता वैष्णो देवी मंदिर हे देशातील पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक आहे. हे त्रिकुट पर्वतावर जम्मूमधील कटरा पासून १४ किमी अंतरावर आहे. हिंदू मान्यतेनुसार हे मंदिर माता राणी आणि वैष्णोदेवी या नावाने ओळखले जाते. घ्या वैष्णो देवीचे दर्शन आणि पाहा मंदिरातील आकर्षक सजावट.
देवी वैष्णोदेवी मंदिराच्या कथा आणि वैभवाबद्दल असे मानले जाते की हे मंदिर पंडित श्रीधर यांनी सुमारे ७०० वर्षांपूर्वी बांधले होते. एका रात्री वैष्णो मातेने श्रीधर या पुरोहीत ब्राम्हणाला स्वप्नात दर्शन दिले आणि त्यांना त्रिकुट पर्वतावरील गुहेचा मार्ग दाखवला, जिथे त्यांचे प्राचीन मंदिर आहे. पुढे हे मंदिर माता वैष्णो देवी म्हणून जगभर ओळखले जाऊ लागले असे सांगितले जाते.
पौराणिक कथेनुसार, वैष्णो मातेचा जन्म दक्षिण भारतातील रत्नाकर येथे झाला. देवीच्या जन्मापूर्वी तिचे पालक निपुत्रिक होते. असे म्हणतात की, जन्माच्या एक रात्री आईने मुलगी जे काही मागेल तिच्या इ्छेविरुद्ध जाणार नाही, अशी शपथ घेतली होती. लहानपणी आईचे नाव त्रिकुटा होते. त्यांचा जन्म भगवान विष्णूच्या वंशात झाला, त्यामुळे त्यांचे नाव वैष्णवी पडले.
माता भगवतीच्या दरबारात नतमस्तक होऊ इच्छिणाऱ्या भाविकांना माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डानेही मोठी भेट दिली आहे. आता ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या भाविकांना रांगेत उभे राहण्यापासून सूट मिळणार आहे. आता त्यांना नोंदणी कार्ड काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नाही. श्राइन बोर्डाने कटरा रेल्वे स्थानकावर स्वयं-नोंदणी बूथ स्थापित केले आहेत. नोंदणीचा क्यू आर कोड स्कॅन केल्याने, कार्ड आपोआप व्हेंडिंग मशीनमधून बाहेर येईल.
नवरात्रीच्या काळात माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी इच्छुक भाविकांसाठी भारतीय रेल्वे विशेष पॅकेज देत आहे. ज्या अंतर्गत एका व्यक्तीसाठी १०,३९५ रुपये, दोन लोकांसाठी ७,८५५ रुपये आणि तीन लोकांच्या एकाच वेळी बुकिंगवर ६,९७५ रुपये प्रति व्यक्ती पॅकेज देण्यात आले आहे. या पॅकेजमध्ये रेल्वेचे भाडे, चार दिवस आणि तीन रात्री राहण्याची सोय, जेवण आणि कॅबची व्यवस्था आदी सुविधा रेल्वेकडून देण्यात येत आहेत.
संबंधित बातम्या