Navratri Pooja : हस्त नक्षत्र आणि इंद्र योगाच्या संयोगात शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. यावेळी नवरात्र ३ ते ११ ऑक्टोबरपर्यंत असून दसरा १२ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. आदिशक्ती नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते. या काळात भक्त आपापल्या क्षमतेनुसार उपवास करतात आणि देवीची पूजा करतात.
शारदीय नवरात्रीचा आज पहिला दिवस आहे. धर्मग्रंथात असे म्हटले आहे की ९ दिवस संपूर्ण कुटुंबासह विधीनुसार दुर्गेची पूजा केल्याने धन आणि धान्याची कमतरता भासत नाही आणि देवीचा आशीर्वाद कुटुंबावर कायम राहतो. गुरुवार ३ ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने नवरात्रोत्सवाची सुरवात होणार आहे. परंपरेनुसार दुर्गा मातेची पूजा केली जाईल. नवरात्रपूजेचे ही काही नियम आहेत, जे पाळणे महत्वाचे आहे. जाणून घेऊया नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा पूजेचा मुहूर्त आणि नवरात्रीची पूजा सुरू करण्यापूर्वी काय करावे?
शारदीय नवरात्र गुरुवार, ३ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होत आहे. आश्विन महिन्यातील प्रतिपदा तिथी आणि उदया तिथीनुसार आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. पंचांगानुसार शारदीय नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला म्हणजेच पहिल्या दिवशी कलश प्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजून ८ मिनिटे ते सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटापर्यंत आहे.
गुरुवार ३ ऑक्टोबर २०२४, घटस्थापनेचा पहिला मुहूर्त - सकाळी ०६.१५ ते ०७.२२, अभिजित मुहूर्त - सकाळी ११.४६ ते दुपारी १२.३३. या दोन्ही शुभ मुहूर्तात घटस्थापना आणि कलश प्रतिष्ठापना करणे अत्यंत शुभ ठरेल.
जवस, माती, पाण्याने भरलेला कलश, गंगाजल, तूप, कलावा किंवा लाल धागा (रक्षासूत), वेलची, लवंग, कापूर, कुंकू, सुपारी, अक्षदा, नाणी, पाच अशोकाची किंवा आंब्याची पाने, नारळ, वस्त्र, सिंदूर, फळे व फुले, फुलांच्या माळा आणि सौभाग्याच्या वस्तू, सप्तधान्य, गहू, ज्वारी आणि त्यासाठी मातीचे भांडे व कलश स्थापनेसाठी तांब्या.
गणपती बाप्पाला प्रथम पुजनीय मानले जाते. तेव्हा नवरात्रीची पूजा सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाला वंदन करून त्यांचे ध्यान करावे. असे मानले जाते की, कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा भगवान गणेशाशिवाय सुरू होत नाही. अशा तऱ्हेने नवरात्रपूजा सुरू करण्यापूर्वी गणपतीची पूजा करावी. भगवंताला जल अर्पण करा, चंदन आणि फुले अर्पण करा आणि क्षमाप्रार्थना करा. त्यानंतर मनोभावे नवरात्रीचे घट स्थापन करून देवीची पूजा करा.
संबंधित बातम्या