Navratri Mahagauri Puja Vidhi : नवरात्रीच्या आठव्या दिवशी दुर्गा देवीचे आठवे रूप महागौरीची पूजा केली जाते. नवरात्रीच्या अष्टमी तिथीला विशेष महत्त्व आहे. आई महागौरीचा रंग अतिशय गोरा आहे. अष्टमीला कन्या पूजनाला महत्व आहे.
महागौरीचे स्वरूप
महागौरीला आदिशक्तीचेच एक रुप मानले जाते. पुराणातील काही उल्लेखांनुसार, आपल्या तेजाने संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करणारी महागौरी देवी आहे. देवीच्या या स्वरुपाला अन्नपूर्णा, ऐश्वर्य प्रदायिनी, चैतन्यमयी असेही संबोधले जाते. चतुर्भुज महागौरीच्या एका हातात त्रिशूल, तर दुसऱ्या हातात डमरू आहे. देवीचा तिसरा हात अभय मुद्रा तर चौथा हात वरदान मुद्रेत आहे.
वयाच्या आठव्या वर्षी तपस्या केल्यामुळे नवरात्रात महागौरी देवीचे पूजन आठव्या दिवशी केले जाते, अशी मान्यता आहे. राक्षस दैत्य शुंभ-निशुंभचा वध करण्यासाठी महागौरीने कौशिकी स्वरुप धारण केले अशीही आख्यायिका आहे.
महागौरी पूजन पद्धत
नवरात्रीत अष्टमीला सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे घाला. देवीच्या मूर्तीला गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने स्नान घालावे. देवीला पांढऱ्या रंगाचे कपडे अर्पण करावेत. धार्मिक मान्यतेनुसार देवीला पांढरा रंग आवडतो. देवीची आंघोळ केल्यावर पांढरे फूल अर्पण करावे. महागौरीला हळद-कुंकू लावावे. देवीला मिठाई, सुका मेवा, फळे अर्पण करा. महागौरी मातेला काळे हरभरे अवश्य अर्पण करा. माता महागौरीचे शक्य तितके ध्यान करावे. तसेच देवीची आरती करावी. नैवेद्य अर्पण करावा. अष्टमीच्या दिवशी कन्या पूजनालाही विशेष महत्त्व आहे. लक्षात ठेवा की मुलींचे वय २-१० वर्षांच्या दरम्यान असावे आणि त्यांची संख्या ९ असावी.
महागौरी देवीचा मंत्र
मंत्र: या देवी सर्वभूतेषु मां गौरी रूपेण संस्थिता।
नमस्तेस्ये नमस्तेस्ये नमस्तेस्ये नमो नमः ।
…
वन्दे वांछित कामार्थे चन्द्रार्घकृत शेखराम्।
सिंहरूढ़ा चतुर्भुजा महागौरी यशस्वनीम्॥
श्वेत वृषे समारूढ़ा श्वेताम्बर धरा शुचि:।
महागौरी शुभं दद्यान्महादेव प्रमोददा॥
महागौरी देवीच्या पूजनाचे महत्व
महागौरीची पूजा केल्याने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात. देवीच्या कृपेने आवडीचा जोडीदार मिळतो. महागौरीची पूजा केल्याने संकटे दूर होतात आणि पापांपासून मुक्ती मिळते. सुख-समृद्धीसोबतच माणसाला सौभाग्यही प्राप्त होते. एखाद्या महिलेने देवीचे भक्तिभावाने पूजन केल्यास देवी नेहमी तिच्या सौभाग्याचे रक्षण करते. विवाह जुळण्यात अडचणी, समस्या येत असतील, तर त्या दूर होतात. जीवन सुखमय होते, असे सांगितले जाते. महाष्टमीला महागौरी देवीचे पूजन केल्यानंतर कुमारिका पूजन करण्याला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते.
संबंधित बातम्या