Navratri Sixth Day : सहावे स्वरूप कात्यायणी देवी, जाणून घ्या पूजेची वेळ, पूजाविधी, मंत्र आणि शुभ रंग
मराठी बातम्या  /  धर्म  /  Navratri Sixth Day : सहावे स्वरूप कात्यायणी देवी, जाणून घ्या पूजेची वेळ, पूजाविधी, मंत्र आणि शुभ रंग

Navratri Sixth Day : सहावे स्वरूप कात्यायणी देवी, जाणून घ्या पूजेची वेळ, पूजाविधी, मंत्र आणि शुभ रंग

Oct 07, 2024 11:29 PM IST

Shardiya Navratri 6th Day 2024 : नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या सहाव्या रूपाची पूजा केली जाते. नवरात्रीच्या सहाव्या माळेला कोणत्या देवीची पूजा केली जाते, पूजा पद्धत, देवीचा मंत्र आणि या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे ते जाणून घ्या.

नवरात्रीची सहावी माळ, नवरात्रचा सहावा दिवस
नवरात्रीची सहावी माळ, नवरात्रचा सहावा दिवस

नवरात्रोत्सव सुरू असून, ३ ते १२ ऑक्टोबर हा उत्सव सुरू राहील. हिंदू धर्मात नवरात्रीचा उपवास उदया तिथीनुसार केला जातो. शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवशी, दुर्गेचे सहावे रूप कात्यायणी देवीची पूजा केली जाते. या वर्षी कात्यायणी देवीची पूजा मंगळवार, ८ ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. कात्यायणी देवीचे पूजनाने सुयोग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो. तसेच विवाहात येणाऱ्या अडचणी, समस्या दूर होतात. भाविकांना सुख, समृद्धी प्राप्त करणे सुलभ होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

पौराणिक कथेनुसार, देवी दुर्गेचे हे रूप कात्यायन ऋषींच्या कन्या म्हणून अवतरले होते. असे म्हणतात की जे भक्त देवीच्या या रूपाची भक्तिभावाने पूजा करतात, त्यांना जगतजनाच्या कृपेने सर्व प्रकारचे भौतिक सुख प्राप्त होते. नवरात्रीच्या सहाव्या माळेची पूजा पद्धत, देवीचा मंत्र आणि या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे ते जाणून घ्या.

कात्यायणी देवीचे स्वरूप

ऋषी कात्यायण यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे देवीला कात्यायणी नावाने संबोधले जाते. देवी भाविकांप्रति अत्यंत उदार असल्याचे मानले जाते. कात्यायणी देवीच्या पूजनाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. तसेच दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायणी देवीचा उल्लेख महिषासुरमर्दिनी असा केल्याचे सांगितले जाते. कात्यायणी देवीचे स्वरुप चतुर्भुज आहे. देवीच्या एका हातात खड्ग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. तर दोन हात अभय मुद्रा आणि वर मुद्रेत आशिर्वादरुपी आहेत. कात्यायणी देवीचे स्वरुप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे सांगितले जाते.

कात्यायणी देवीचे आवडते फुल, फळ

देवीला लाल जास्वंदाचे फुल अर्पण करा. कात्यायनी मातेला मध आणि गोड खायचे पान अर्पण करावे, देवीला ते आवडते असे सांगितले जाते. हे अर्पण केल्याने व्यक्तीचे सौंदर्य वाढते.

कात्यायणी देवीची पूजा पद्धत

सकाळी लवकर उठणे, आंघोळ वगैरे करून मग स्वच्छ कपडे घाला. देवीच्या मूर्तीला शुद्ध पाण्याने किंवा गंगाजलाने स्नान घालावे. देवीला पिवळ्या रंगाचे कपडे अर्पण करावेत. मातेला आंघोळ करून पुष्प अर्पण करावे. देवीला हळदी-कुंकू लावावे. देवीला पाच प्रकारची फळे आणि मिठाई अर्पण करा. कात्यायनी मातेला मध अवश्य अर्पण करा. माता कात्यायणीचे शक्य तितके ध्यान करावे. तसेच मातेची आरती करावी.

कात्यायणी देवीचा मंत्र

कंचनाभा वराभयं पद्मधरां मुकटोज्जवलां।

स्मेरमुखीं शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते॥

शारदीय नवरात्रीचा सहावा दिवस आजचा रंग

शारदीय नवरात्रीच्या सहाव्या दिवसाचा शुभ रंग लाल आहे. लाल रंग कात्यायणी मातेला समर्पित आहे. हा रंग धैर्य आणि शक्ती दर्शवतो.

 

 

Whats_app_banner