Navratri Fourth Day : चौथे स्वरूप कूष्मांडा देवी, जाणून घ्या पूजेची वेळ, पूजाविधी, मंत्र आणि शुभ रंग
मराठी बातम्या  /  धर्म  /  Navratri Fourth Day : चौथे स्वरूप कूष्मांडा देवी, जाणून घ्या पूजेची वेळ, पूजाविधी, मंत्र आणि शुभ रंग

Navratri Fourth Day : चौथे स्वरूप कूष्मांडा देवी, जाणून घ्या पूजेची वेळ, पूजाविधी, मंत्र आणि शुभ रंग

Published Oct 05, 2024 11:04 PM IST

Navratri 4th Day : नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते. कुष्मांडा देवीची पूजा केल्याने सर्व रोग आणि दोष नष्ट होतात. नवरात्रीच्या चौथ्या माळेला देवीच्या कोणत्या स्वरूपाची पूजा केली जाते, पूजा पद्धत, देवीचा मंत्र आणि या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे ते जाणून घ्या.

नवरात्रीची चौथी माळ
नवरात्रीची चौथी माळ

Navratri 4th Day Kushmanda Devi : नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा विधीपूर्वक केली जाते. सध्या शारदीय नवरात्र सुरू आहे. ६ ऑक्टोबर हा शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस आहे. नवरात्रीच्या चौथ्या माळेला देवीच्या कोणत्या स्वरूपाची पूजा केली जाते, पूजा पद्धत, देवीचा मंत्र आणि या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे ते जाणून घ्या.

चौथी माळ कुष्मांडा देवीचे स्वरूप

नवरात्रीच्या चौथ्या दिवसाची प्रमुख देवता देवी कुष्मांडा आहे. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते. कुष्मांडा देवीला आठ हात आहेत. दुर्गा देवीचे चौथे स्वरुप असलेली कूष्मांडा देवी अष्टभुजा आहे. देवीने बाण, चक्र, गदा, अमृत कलश, कमळ, कमंडलू, सिद्धी आणि निधींची माळ आदी भुजांमध्ये धारण केले आहे. कूष्मांडा देवीचे वाहन सिंह आहे. कुष्मांडा देवीची पूजा केल्याने सर्व रोग आणि दोष नष्ट होतात, असे सांगितले जाते.

आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कूष्मांडा देवी असे म्हटले जाते. देवी विश्वाच्या मध्यभागी राहते आणि संपूर्ण जगाचे रक्षण करते. कुष्मांडा देवीच्या उपासनेने कीर्ती, शक्ती आणि संपत्ती वाढते. कुष्मांडा माता सूर्यमालेच्या आतील जगात वास करते. मातेच्या शरीराचे तेज देखील सूर्यासारखे आहे आणि तिचे तेज आणि प्रकाश सर्व दिशांना प्रकाशित करतात. 

कुष्मांडा देवीचे पूजन विधी

सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर दुर्गा देवीच्या कूष्मांडा स्वरुपाच्या पूजनाचा संकल्प करावा. यथाशक्ती, आपापल्या पद्धती, परंपरांनुसार देवीचे पूजन करावे. देवीचे पूजन करताना लाल रंगाची फुले, जास्वंद किंवा गुलाबाचे फूल आवर्जुन वहावे. यानंतर धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. देवीचे पूजन करताना हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. कूष्मांडा देवीला पांढऱ्या रंगाच्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. यामध्ये दही, साखर फुटाणा असल्यास उत्तम, असे सांगितले जाते. पूजेच्या शेवटी मातेचा मंत्र म्हणा आणि आरती करा. कूष्मांडा देवीची उपासना मनुष्याला रोगापासून मुक्त करून सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन जाणारी ही देवी आहे, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

कुष्मांडा देवीचे मंत्र

ॐ देवी कूष्माण्डायै नमः॥

या देवी सर्वभू‍तेषु माँ कूष्माण्डा रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस आजचा रंग

शारदीय नवरात्रीच्या चौथ्या दिवसाचा शुभ रंग नारंगी/ऑरेंज आहे. नवरात्रीचा रंग आठवड्यातील त्या दिवसाच्या आधारे निवडला जातो ज्यामुळे सणाची सुरुवात होते.

Whats_app_banner