नवरात्रोत्सव म्हणजे नऊ रात्री चालणारा उत्सव होय. दुर्गामातेला समर्पित नऊ दिवसांच्या उत्सवाला गुरुवार, ३ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. उद्या घटस्थापना करून नवरात्रीची सुरवात होईल. नवरात्रीचे उपवास आणि गरब्यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम या सणाचे औचित्य साधतात. याव्यतिरिक्त, सर्व नऊ दिवस देवीच्या विविध नऊ रूपांना समर्पित असतात, ज्याला 'आदिशक्तीचे नऊ रूप' देखील म्हणतात. नवरात्रीचा पहिला दिवशी देवीच्या कोणत्या स्वरूपाची पूजा करतात, पूजनाची वेळ, पूजा विधी आणि शुभ रंग कोणता ते जाणून घेऊया.
नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्री देवीला समर्पीत आहे. म्हणून पहिली माळ किंवा पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते.
देवीचे वर्णन पर्वतांची कन्या म्हणून करण्यात आले आहे. देवीचे नाव शिलापुत्री हे दोन संस्कृत शब्दांनी बनलेले आहे: 'शील', ज्याचा अर्थ खडक आणि 'पुत्री' म्हणजे मुलगी. शिला पुत्री कोट्यवधी सूर्य आणि चंद्रांप्रमाणेच सकारात्मकता, आनंद आणि प्रकाश पसरवण्यासाठी ओळखली जाते. देवी सतीने हिमालय कन्येच्या रुपात जन्म घेतला. तीच पुढे शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली.
शैलपुत्री देवीच्या ललाटावर अर्ध चंद्र स्थापित आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशुल आणि डाव्या हातात कमळाचे फुल आहे. नंदी हे शैलपुत्री देवीचे वाहन आहे. म्हणून शैलपुत्री देवीला वृषभारुढा असेही संबोधले जाते. नवरात्रातील पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीचे पूजन केल्यास चंद्र दोष नाहीसा होतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची पूजेची वेळ गुरुवारी पहाटे पासून सुरू होईल. शुभ घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी ६.३० वाजता सुरू होईल आणि ७.३१ वाजता संपेल. अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून ३ मिनिटांनी सुरू होईल आणि १२ वाजून ५१ मिनिटांनी संपेल.
शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा शुभ रंग पिवळा आहे. नवरात्रीचा रंग आठवड्यातील त्या दिवसाच्या आधारे निवडला जातो ज्यामुळे सणाची सुरुवात होते.
हिमालय कन्या असल्यामुळे शैलपुत्री देवीला बर्फाप्रमाणे पांढरा रंग प्रिय आहे. म्हणूनच देवीची पूजा पांढऱ्या रंगाच्या फुलांनी केली जाते. तसेच पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करणे शुभ मानले गेले आहे. तसेच देवीला पांढऱ्या रंगाचा समावेश असलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते.
शैलपुत्री देवीचे वाहन हे गाय आहे. त्यामुळे त्यांना गाईच्या दुधापासून बनवलेल्या वस्तू अर्पण करणे शुभ मानले जाते. तुम्ही शैलपुत्री देवीला दुधापासून बनवलेली खीर किंवा मिठाई अर्पण करू शकता.
शैलपुत्री देवी बीज मंत्र- या देवी सर्वभूतेषु मां शैलपुत्री रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
शैलपुत्री देवी मंत्र- 1. ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ॐ शैलपुत्री देव्यै नम।