Navami Tithi 2023 Importance In Marathi : शारदीय नवरात्रीत नवमी तिथी हा अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो. या तिथीला महानवमी, आयुध नवमी असंही म्हटलं जातं. शस्त्रास्त्रांची पूजा आणि नवरात्रोत्थापन देखील याच दिवशी केलं जातं आणि देवीला बलिदान देण्याचीही प्रथा-पंरपंरा आहे. नवमीला पारणा आणि होमहवनही केली जाते. त्यामुळं या दिवशी भाविकांमध्ये भक्तिमय वातावरण पाहायला मिळतं. ज्योतिषविद्येचे अभ्यासक जय घोडके (jaynews21@gmail.com) सांगताहेत नवमी तिथीची महत्त्व आणि तिथीचं धार्मिक कारण.
महिषासुरमर्दिनी दुर्गा मातेनं नवमीला महिषासुर दैत्याचा वध केला. या दैत्याचा पराभव करण्यासाठी सर्व देवतांनी आपली शस्त्रं, अस्त्र देवीला दिली. हे युद्ध नऊ दिवस चाललं. नवमीच्या देवी दुर्गेने महिषासुराचा वध करून युद्ध संपवलं. हा दिवस महानवमी म्हणून साजरा केला जातो आणि आयुध पूजेचा विधी केला जातो. देवीनं वापरलेली सर्व शस्त्रं आणि साधनांच्या सन्मानार्थ युद्ध संपल्यानंतर सर्व शस्त्र साधनांची पूजा करून ती एकाच ठिकाणी ठेवली गेली. व्यावसायिक ठिकाणं आणि घरांमधील आयुध, शस्त्रं, यंत्रसामग्री आणि इतर अनेक वस्तूंचा सन्मान करण्याच्या भावनेनं हा उत्सव साजरा केला जातो. महानवमीचं विशेष महत्त्व मानले जाते कारण या दिवशी उपजीविकेसाठी वापरल्या जाणार्या साधनांची पूजा केली जाते आणि प्रार्थना केली जाते.
महिषा सुर दैत्य देवीस मृत्यूपूर्वी शरण गेला आणि देवीस वर मागीतला. देवीच्या नावाच्या आधी त्याच्या नावाचा उल्लेख व्हावा. म्हणून देवीस महिषासुरमर्दिनी दुर्गा असेही म्हणतात. त्यामुळं महानवमीला देवीस बळी देण्याची परंपरा आहे. काही भागात प्राण्यांचा बळी दिला जातो. पंरतु ही प्रथा अयोग्य असल्याने मान्यतेनुसार दुर्गा मातेस कोहळ्याचा बळी दिला जातो.
महानवमीच्या पूर्वसंध्येला नवमी होम आणि हवनाला खूप महत्त्व आहे. नवमी पूजा संपल्यानंतर नवमी हवन केलं जातं. देवी आदिशक्तीने दुर्गेचं रूप धारण केलं आणि आठ दिवस महिषासुराशी युद्ध करून नवव्या दिवशी तिचा वध केला. ज्या दिवशी मातेने या अत्याचारी राक्षसाचा वध केला तो दिवस 'महानवमी' म्हणून ओळखला जाऊ लागला. महानवमीच्या दिवशी महास्नान व षोडशोपचार पूजा करण्याची प्रथा आहे. अष्टमीच्या संध्याकाळी सूर्यास्तानंतर ही पूजा केली जाते. नवमीच्या दिवशी सकाळी दुर्गायज्ञ पूजा केली जाते. नवमीच्या दिवशी हवन करणे आवश्यक मानलं जातं, कारण या दिवशी नवरात्रीची समाप्ती होत असते.