मराठी बातम्या  /  धर्म  /  Modi in Australia : मोदींनी ऑस्ट्रेलियात जाऊन हिंदू मंदिरांंचा विषय का उपस्थित केला?

Modi in Australia : मोदींनी ऑस्ट्रेलियात जाऊन हिंदू मंदिरांंचा विषय का उपस्थित केला?

May 24, 2023 11:01 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. मात्र त्यात कळीचा मुद्दा होता तो म्हणजे ऑस्ट्रेलियात हिंदू मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऑस्ट्रेलिया दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऑस्ट्रेलिया दौरा (HT)

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. ऑस्ट्रेलियात मोदी नामाच जयघोष सध्या पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. मात्र त्यात कळीचा मुद्दा होता तो म्हणजे ऑस्ट्रेलियात हिंदू मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत.

दोन्ही देशाच्या प्रतिनिधींनी या विषयाला गांभिर्याने घेण्याची गरज असल्याचं मान्य केलं. मात्र पंतप्रधान मोदी यांनी हिंदू मंदिरांवर ऑस्ट्रेलियात वाढते हल्ले गंभीर असल्याचं रोखठोक प्रतिपादन केलं.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आम्ही अशा कोणत्याही असामाजिक घटकांना पाठीशी घालणार नाही, ज्यामुळे भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांना हानी पोहोचेल. गेल्या काही महिन्यांत ऑस्ट्रेलियातील हिंदू मंदिरांवर हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील खलिस्तान समर्थक सातत्याने हिंदू मंदिरांना लक्ष्य करत आहेत. आज पंतप्रधान अल्बानीज यांनी मला पुन्हा एकदा आश्वासन दिले आहे की ते भविष्यातही अशा घटकांवर कठोर कारवाई करतील.

ट्रेंडिंग न्यूज

गेल्या दोन महिन्यात चार मंदिरांवर झाले आहेत हल्ले

मार्च २०२३ मध्ये ब्रिस्बेनमधील प्रमुख हिंदू मंदिर श्री लक्ष्मी नारायण मंदिरावर खलिस्तान समर्थकांनी हल्ला केला होता. जानेवारी महिन्यात मेलबर्नमध्ये अवघ्या १५ दिवसांत तीन हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्यात आले. सर्वप्रथम, १२ जानेवारी रोजी मेलबर्नच्या मिल पार्कमधील BAPS स्वामीनारायण मंदिराची भारतविरोधी आणि हिंदुविरोधी घोषणांनी तोडफोड करण्यात आली. यानंतर १८ जानेवारीला मेलबर्नमधील श्री शिव विष्णू मंदिराची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर पाच दिवसांनी २३ जानेवारीला मेलबर्नच्या अल्बर्ट पार्कमधील इस्कॉन मंदिरात भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या. ऑस्ट्रेलियातल्या हिंदू मंदिरांवर वाढते हल्ले ही अतिशय चिंतेची बाब असल्याचं मोदींनी नमूद केलं.

त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अॅडमिरल्टी हाऊसमध्ये गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागत करण्यात आलं. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात योग, संस्कृती आणि क्रिकेट यागोष्टींचं नातं अत्यंत जुनं असल्याचं मोदी म्हणालेत.

काय म्हणाले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज?

मोदीच्या याच बोलण्यावर प्रतिक्रीया देताना ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांनी पंतप्रधान मोदींना ही गंभीर बाब असून यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं. पंतप्रधान अल्बानीज म्हणाले की, ऑस्ट्रेलिया सर्व धर्मांचा सन्मान करणारा देश आहे. इथं सर्व प्रकारचे लोक सलोख्याने राहातात, मंदिरांवरील वाढत्या घटना अत्यंत चिंतेची बाब असून ऑस्ट्रेलिया सरकार भारतीय नागरिक आणि हिंदू मंदिरांच्या संरक्षणासाठी कटीबद्ध असल्याचं नमूद केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अँथनी अल्बानीज यांच्या भारत दौऱ्यातही याच गोष्टीचा उल्लेख केला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियात पुन्हा एकदा हाच मुद्दा उपस्थित केला आहे. यावर आता ऑस्ट्रेलिया सरकार काय पावलं उचलतं हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

 

WhatsApp channel
विभाग