वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरून विष्णूंनी हा नृसिंह अवतार घेतला, असे सांगितले जाते. म्हणून वैशाख शुद्ध चतुर्दशी ही तिथी नृसिंह जयंती म्हणून साजरी केली जाते. यंदा नृसिंह जयंती २१ मे २०२४ रोजी साजरी केली जात आहे.
वैदिक दिनदर्शिकेनुसार, यावेळी वैशाख शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी २१ मे रोजी सायंकाळी ५.४० वाजता सुरू होईल आणि ही तिथी २२ मे रोजी सायंकाळी ६.४५ वाजता समाप्त होईल. या दिवशी संध्याकाळी भगवान नरसिंहाची पूजा केली जाते. अशा प्रकारे, हा उत्सव मंगळवार, २१ मे २०२४ रोजी साजरा केला जाईल. या दिवशी पूजेची वेळ दुपारी ४ वाजून २४ मिनिटे ते ७ वाजून ९ मिनिटापर्यंत असेल.
हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांकडून वर मागतांना म्हटले होते की "तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री, ना शस्त्राने ना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवांकडून, दानवांकडून, मृग, महानाग, यांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे, युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा, व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे."
या वराचा मान राखत भगवान विष्णूंनी नर-सिंह म्हणजेच शरीर मनुष्याचे व मुख सिंहाचे असे रूप धारण केले. हिरण्यकशिपूला नृसिंहाने न दिवसा, न रात्री तर संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी. न घरात न बाहेर, तर घराच्या दरवाज्यात उंबरठ्यावर मृत्यू दिला. ना शस्त्र ना अस्त्र, तर आपल्या नखांनी नरसिंहांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडले. भूमीवर नाही आणि आकाशातही नाही, तर आपल्या मांडीवर झोपवून हिरण्यकश्यपूचा वध केला. असे हे नरसिंहांनी ब्रह्मदेवांचे वचन सत्य केले आणि जनकल्याणासाठी एका क्रूर दैत्याचा अंतही केला.
या दिवशी संध्याकाळी भगवान नृसिंहाची पूजा करण्याची परंपरा आहे. पूजेपूर्वी आंघोळ करावी, धुतलेले कपडे परिधान करावे, पूजेच्या ठिकाणी ईशान्य कोपऱ्यातील एका खांबावर लाल, पांढरे किंवा पिवळे कापड पसरावे, त्यावर भगवान नरसिंह आणि लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा चित्र स्थापित करून पूर्वेकडे तोंड करून पूजा करण्यासाठी बसावे. भगवान नृसिंहाच्या पूजेमध्ये पंचामृत, फळे, फुले, पंचमेव, कुंकू, केशर, नारळ, अक्षदा आणि पितांबर यांचा वापर करावा. देवासमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. या दिवशी उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी गरीब लोकांना थंड वस्तू दान करा. भगवान नृसिंहाच्या मंत्राचा जप करावा.
ऊँ नरसिंहाय वरप्रदाय नमः.
संबंधित बातम्या