श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनासह नारळी पौर्णिमेचा सण साजरा करतात. या सणाचे महत्व कोळी लोकांमध्ये जास्त असून, हा सण महाराष्ट्र, दक्षिण भारत आणि उत्तर भारतात मोठ्या उत्साहात साजरा करतात. १९ ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा सण साजरा करण्यात येईल.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी मच्छिमार समुद्र देवतेची विशेष पूजा करतात. या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. निसर्गाचे महत्व असणारा हा सण कोळी लोकांमध्ये प्रचलित आहे. असे मानले जाते की, श्रावण पौर्णिमेला पूजा विधी केल्याने समुद्रदेव प्रसन्न होतो. समुद्राच्या सर्व संकटांपासून मच्छिमारांचे रक्षण व्हावे यासाठी कोळी लोकं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात.
श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी संस्कृत दिवस, नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा आणि गायत्री जयंतीचा उत्सव आहे. हा एक दुर्मीळ योग आहे.
नारळी पौर्णिमा हा सण किनारी प्रदेशात राहणार्या मच्छिमार समुदायाद्वारे खास साजरा केला जातो. या दिवशी भगवान शंकराचीही पूजा केली जाते. नारळाचे तीन डोळे हे त्रिनेत्रधारी शंकराचे प्रतीक आहेत आणि श्रावण महिना हा भगवान शंकराचा आवडता आणि पवित्र महिना आहे. या दिवशी भगवान शंकराला नारळ आणि त्यांच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्या जातात.
या उत्सवाच्या काही दिवस आधी, मच्छीमार त्यांचे जुने मासेमारीचे जाळे दुरूस्त करतात, जुन्या बोटी रंगवतात किंवा नवीन बोट विकत घेतात आणि मासेमारीची जाळी बनवतात. उत्सवाच्या दिवशी भक्त समुद्र देव वरूणची पूजा करतात. महाराष्ट्र राज्यातील ब्राह्मण श्रावणी उपकर्म करतात आणि या दिवशी कोणताही पदार्थ न खाता उपवास करतात. ते फक्त नारळ खाऊन फलाहार करतात.
सणाच्या दिवशी नारळी भात किंवा यांसारखे पारंपारिक अन्न तयार केले जाते ज्यामध्ये नारळाचा समावेश असतो. मच्छिमारांसाठी समुद्र पवित्र आहे कारण त्यांच्या उदर्निवाहाचे ते मूळ साधन आहे. ते बोटींचीही पूजा करतात. पूजा विधी पूर्ण केल्यानंतर, मच्छीमार त्यांच्या सुशोभित बोटीतून समुद्रात जातात. एक छोटासा प्रवास करून ते किनाऱ्यावर परततात आणि उर्वरित दिवस नाचण्यात आणि गाण्यात घालवतात. नृत्य आणि गायन हा या उत्सवाचा अविभाज्य भाग आहे. नारळी पौर्णिमा हा सण येणारे वर्ष सुख, आनंद आणि संपत्तीने भरलेले असेल याचे सूचक आहे.