इस्लामिक नववर्षाला सुरुवात झाली आहे. ज्याला आपण 'मोहरम' या नावाने ओळखतो. मोहरम हा इस्लाममधील पहिला महिना आहे. वास्तविक हा महिना शोक व्यक्त करण्याचा महिना समजला जातो. कारण या महिन्यात इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचे लाडके नातू इमाम हसन-हुसैन हे युद्धात शहीद झाले होते. आज पाहता पाहता इस्लामिक नववर्षाचा सहावा दिवस आहे. देशभरात सध्या शिय्या लोक दर्गेत पीर बसवून मोहरम साजरा करत आहेत. इस्लामिक कॅलेंडरमध्ये मोहरमच्या सहाव्या दिवसाला विशेष महत्व आहे. आज आपण त्याबाबतच जाणून घेणार आहोत.
आज मोहरमची सहावी तारीख आहे. हिजरी कँलेंडरनुसार या दिवसाला महत्वाचे स्थान आहे. मोहरमची सहावी तारीख इमाम हुसैन यांचे पुत्र मोहम्मद अली अकबर यांच्याशी संबंधित आहे. आज जगभरातील मुस्लिम इमाम हुसैन यांचे लाडके पुत्र अली अकबर यांच्या स्मृतीत विविध कार्य करतात. यामध्ये शिय्या आणि सुन्नी मुस्लिम यांच्या कार्यपद्धतीत काहीसा फरक आढळतो. सामन्यतः आजच्या दिवशी अल्लाहजवळ प्रार्थना करून त्यांच्या हौतात्म्याची आठवण केली जाते. शिवाय इस्लामिक ग्रंथांचे पठण केले जाते. त्यामुळे आजचा दिवस प्रत्येक मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा आहे.
प्रत्येक धर्मात पाणी आणि अन्न दान पुण्याचे समजले जाते. त्यामुळेच लोक विविध महत्वाच्या प्रसंगी हे दान आवर्जून करत असतात. आज मोहरमच्या सहाव्या दिवशीसुद्धा मोहम्मद अली अकबर यांच्या हौतात्म्याची आठवण ठेवत मुस्लिम लोक गरजूंना जेवायला वाढतात. निर्जन ठिकाणी लोकांची तहान भागावी म्हणून पाण्याची सोय करतात. शिवाय सरबतसुद्धा वाटप करतात. आज अशी अनेक पुण्याची कार्ये मुस्लिम बांधव करत असतात.
मोहम्मद अली अकबर इमाम हुसैन यांच्यासाठी पुत्र म्हणून तर मौल्यवान होताच. मात्र आणखी एका कारणाने ते इमाम हुसैन यांच्यासाठी महत्वाचे होते. याचे कारण मौलाना सय्यद नाजीश अकबर काझमी यांनी सांगितले आहे. त्यांच्या मते इस्लामिक मान्यतेनुसार, इमाम हुसैन यांचे पुत्र अली अकबर हे हुबेहूब हजरत मोहम्मद पैगंबर यांच्यासारखे दिसत होते. अली अकबर यांना पाहून लोकांना त्यांची आठवण येत असे. त्यामुळेच सर्वांसाठी अली अकबर प्रचंड प्रिय होते.
इस्लामिक अभ्यासानुसार ज्यावेळी हिजरी ६१ मध्ये इराकमधील करबलाच्या मैदानात युद्ध झाले. त्यावेळी मोहम्मद अली अकबरदेखील त्यात सहभागी होते. क्रूर यजिदच्या सैनिकांनी ३ दिवसांपासून तहानलेल्या आणि उपाशी असलेल्या अली अकबर यांच्यावरदेखील हल्ला केला होता. अली अकबर जेव्हा या युद्धात शहीद झाले तेव्हा ते अवघ्या १८ वर्षांचे होते. आणि आज तोचा दिवस आहे. त्यामुळेच आज त्यांच्या या हौतात्म्याची आठवण केली जाते. महत्वाचे म्हणजे या युद्धात शहीद झालेल्यांच्या आठवणीत मोहरम महिन्यात शोक व्यक्त केला जातो.
संबंधित बातम्या