प्रेरित करणाऱ्या कथा
एके दिवशी स्वामी विवेकानंद आपल्या पाळीव श्वानासह आश्रमाच्या आसपास फिरत होते. अचानक त्यांच्या समोर एक युवक येऊन थांबला. त्या युवकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची निराशा स्पष्टपणे दिसत होती. त्या युवकाला पाहून स्वामी विवेकानंद थांबले आणि त्यांनी त्या युवकाला येण्याचं प्रयोजन विचारलं.
युवक म्हणाला, “स्वामीजी मी खूप वैतागलो आहे. मी शिकलेलो आहे, मात्र मला काही केल्या यश मिळत नाही, मला दारोदार फिरावं लागतं आहे. मी सर्व प्रकारचे उपाय करुन पाहिले. मात्र, माझ्यासारख्या शिकलेल्या युवकाची फरफटच होत आहे. कृपा करुन मला काहीतरी योग्य मार्ग सांगा”, असं तो युवक स्वामी विवेकानंद यांना म्हणाला.
स्वामी विवेकानंद यांनी क्षणाचीही वाट न पाहाता त्याला सांगितलं, “माझ्या या श्वानाला थोडावेळ फिरवून आण”. तो युवक थबकला, त्याला काही समजेना, मी स्वामी विवेकानंद यांना माझी व्यथा सांगितली तर त्यावर काही मार्ग सांगण्याऐवजी ते मला त्यांच्या श्वानाला फिरवून आणायला का सांगतायत? माझ्या अपयशाचा आणि या श्वानाला फिरवण्याचा काय संबध? असे एक ना अनेक प्रश्न त्या युवकाच्या मनात घोळू लागले. मात्र स्वामी विवेकानंद यांची आज्ञा मानून तो युवक त्या श्वानाला घेऊन गेला.
जवळपास तास दीड तासाने तो युवक त्या श्वानाला घेऊन परत आला. स्वामी विवेकानंद यांनी पाहिलं तर तो युवक ताजातवाना दिसत होता, मात्र श्वान चांगलाच दमलेला होता. स्वामी विवेकानंद यांनी त्या युवकाला हाच प्रश्न केला. स्वामी म्हणाले, “तू इतकावेळ फिरुनही ताजातवाना वाटतोस आणि माझा श्वान मात्र इतका दमलेला का वाटतोय”?
त्या प्रश्नावर तो युवक तात्काळ उत्तरला, “अहो स्वामीजी तो श्वान इतका वेळ या गल्लीतून त्या गल्लीत, या दारातून त्या दारात जात होता. मी त्याच्यामागगे फिरत होतो. तो श्वान कधीकधी कोणावर भुंकतही होता. मात्र मी त्याच्या मागे फिरत राहीलो. खूप धावपळ झाल्याने श्वान थकला असावा”, असं तो युवक म्हणाला.
एक नजर त्या युवकाकडे टाकून स्वामी विवेकानंद म्हणाले, “यातच तुझ्या मगाचच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. इतरांच्या मागे जाऊन, इथे तिथे भटकून तू दमला आहेस म्हणून तुला यश मिळत नाही. विचार न करता तू इतरांच्या मागे जातोस आणि दमतोस. तुला काय करायचं आहे, तुझं ध्येय काय आहे याचा विचार पक्का कर आणि मग त्या दृष्टीने वाटचाल कर यश नक्कीच मिळेल”.
इतका वेळ मनात विचारांचा काहूर माजलेल्या त्या युवकाला स्वामी विवेकानंद यांचे हे शब्द ऐकून क्षणात समाधान मिळालं. तो युवक स्वामी विवेकानंद यांच्या आश्रमाच्या बाहेर पडला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होतं.