मार्गशीर्ष महिना हा भक्ती भावाचा असतो. या महिन्यातील प्रत्येक वार आणि तिथीचे आगळे-वेगळे महत्व आहे. गुरुवार ४ जानेवारी हा मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार असून, पुढचा गुरुवार ११ जानेवारी रोजी आहे. यादिवशी अमावस्या असल्यामुळे गुरुवारच्या व्रताचे उद्यापण ४ तारखेला करायचे की ११ ला असा काहीसा गोंधळ होत असेल तर व्रताची सांगता कधी व कशी करावी हे जाणून घ्या.
महालक्ष्मीचे हे व्रत सुख-शांती, समाधान, ऐश्वर्य मिळावे म्हणून तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करण्यात येते. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे असा नियम आहे.
अमावस्या असल्यामुळे ४ जानेवारीलाच गुरुवार व्रताचे उद्यापन करावे असा गोंधळ निर्माण झाला आहे, परंतू हे शास्त्र मान्य नाही. अमावस्या ही अशुभ मानली जात नाही, अमावस्येलाच आपण लक्ष्मी पूजन करतो त्यामुळे हा पर्वकाळ मानावा. यामुळे आणखी एक गुरुवारचे व्रत करण्याचे फळ मिळेल. अमावस्येचा आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचा तसा काहीही संबंध नाही. त्यामुळे मनात कोणताही संभ्रम न ठेवता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन ११ जानेवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारीच संपूर्ण पूजा विधीसह संपन्न करावे.
इतर गुरुवारप्रमाणे पुजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करावी.
महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी. संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवावा.
संध्याकाळी सुवासिनींना हळदी-कुंकवासाठी आमंत्रित करावे.
त्यांना फळे, फुलं, गजरा महालक्ष्मी व्रताची पुस्तक, एखादी भेटवस्तू देऊन, त्यांची ओटी भरावी व नमस्कार करावा. आपल्या इच्छेनुसार दूध किंवा सुवासिनींना भोजन द्यावे. या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून, सर्व स्नानादी कार्य करून स्वच्छ वस्त्र घालावी आणि लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी. लक्ष्मी व्रताची कथा वाचावी. देवीची आरती करावी. कळत नकळत एखादी चूक झाली असेल तर त्यासाठी क्षमा प्रार्थना मागावी. यानंतर कळश हलवावा.