Mangalagaur Celebration : स्वीडनमध्ये थाटात साजरा झाला ‘मंगळागौर’चा सण-marathi community celebrated manglagaur festival in sweden ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Mangalagaur Celebration : स्वीडनमध्ये थाटात साजरा झाला ‘मंगळागौर’चा सण

Mangalagaur Celebration : स्वीडनमध्ये थाटात साजरा झाला ‘मंगळागौर’चा सण

HT Marathi Desk HT Marathi
Aug 29, 2024 08:00 PM IST

स्वीडनमध्ये राहणाऱ्या अनिवासी भारतीय मराठी नागरिकांनी मंगळागौरचा कार्यक्रम मोठ्या थाटात साजरा केला. गोथनबर्ग महाराष्ट्र मंडळाद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

स्वीडनमध्ये मंगळागौरचा सण साजरा
स्वीडनमध्ये मंगळागौरचा सण साजरा

श्रावण महिना हा सण, उत्सव आणि व्रतवैकल्याचा महिना मानला जातो. श्रावण महिना हा नवविवाहितांसाठी खास असतो. श्रावणात नवविहावित तरुणी माहेरी जाऊन मंगळागौरचं व्रत करत असतात. नोकरी व्यवसायानिमित्त जगभरात विखुरलेले मराठी नागरिक आपले मराठमोळे सण आणि संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी कायम अग्रेसर असतात. स्वीडनमध्ये राहणाऱ्या अनिवासी भारतीय मराठी नागरिकांनी मंगळागौरचा सण नुकताच मोठ्या उत्साहात साजरा केला. स्वीडनमध्ये गोथनबर्ग शहरात यंदा मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गोथनबर्ग महाराष्ट्र मंडळाद्वारे गेल्या वर्षी या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. गेल्यावर्षी मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे यावर्षी नव्या जोमाने मंगळागौरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

मंगळागौरच्या या कार्यक्रमात स्वीडनच्या गोथनबर्ग शहरात मोठ्या प्रमाणावर महिला एकत्रित आल्या होत्या. याप्रसंगी महिलांनी आकर्षक साड्या परिधान केल्या होत्या. महिला वर्गाने एकत्र येऊन भरपूर पारंपरिक खेळ खेळले, गाणी गायली आणि नृत्यही केले. यात झिम्मा, फुगडी, लेझीम सारखे पारंपरिक अशा खेळांचा समावेश होता. या कार्यक्रमात खूप धमाल आली अशी माहिती गोथनबर्ग, स्वीडन येथे राहणाऱ्या प्रणाली मानकर-पतके यांनी 'हिंदुस्तान टाइम्स मराठी'ला दिली.  

कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी विविध पारंपरिक मराठी खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात आले होते. यात पुरणपोळी, मोदक आणि इतर खाद्यपदार्थांचा समावेश होता.