Tileshwar Ganapati Bappa Temple : हिंदू धर्मातील नवीन वर्षातील पहिला आणि महत्वाचा सण म्हणून मकर संक्रांतीला तिळगूड वाटून परस्पर वर्षभर गोड बोलण्याचा शब्द दिला जातो, पतंग उडवतात, वाण दिले जाते, तसेच सणाच्या दिवशी गोड-धोड बनवले जाते. कुटूंबात आनंदाचे वातावरण असते.
सूर्य प्रत्येक महिन्यात राशीत गोचर करतो यालाच संक्रांती म्हणतात आणि जानेवारी महिन्यात सूर्य मकर राशीत संक्रमण करतो म्हणून या दिवसाला मकर संक्रांती असे म्हणतात. मकर सक्रांती सणाच्या विविध मान्यता आहे. एका गणपती मंदिराचीही मकर संक्रांती सणाशी संबंधीत आख्यायिका असून, जाणून घेऊया यासंबंधी सविस्तर.
नाशिकमधील अष्टविनायकांपैकी एक असलेला गणपती म्हणजेच तिळेश्वर. नाशिक शहरात गणेशवाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी ७५० वर्षांपूर्वी स्व. दामोदर दगडूशेठ सोनार यांच्या घराचा पाया खणताना ही डाव्या सोंडेची गणपतीची स्वयंभू मूर्ती सापडली. दामोदर सोनार यांच्या घराजवळच या श्री गणेश मूतीर्ची स्थापना करण्यात आली व मोठे मंदिर बांधण्यात आले.
या गणपतीचे वैशिष्ट्य म्हणजे हा गणपती दर संक्रांतीला तीळ - तीळ वाढतो. म्हणून या गणेशाचे नाव तिळा गणपती पडले आणि येथील वस्तीचे नावही गणेशवाडी असे झाले. ज्यावेळी गणपतीची मूर्ती मिळाली तेव्हा ती अतिशय लहान होती, शेंदूर विलेपनामुळे आता तिचा आकार वाढला आहे. हे आकार वाढण्याचे प्रमाण तिळाइतके आहे, म्हणून याला तिळा गणपती असे म्हणतात.
गेल्या काही पिढ्यांपासून या गणेशाची सोनार परिवार सेवा करते आहेत. पुरातन बांधकामाचा नमुना असलेले हे मंदिर चुना , वाळू , विटा याद्वारे बनविण्यात आले आहे. सभामंडप त्यापुढे गर्भगृह असून दोन्ही वरील छत घुमटाकार आहे. गर्भगृहाला समोरासमोर दोन खिडक्या आहेत. सभामंडप आणि गर्भगृहाच्या दाराची उंची अतिशय कमी असल्यामुळे खाली वाकूनच आत प्रवेश करावा लागतो. हे मंदिर बांधले गेले त्यावेळी नाशिक हे गुलशनाबाद नावाने ओळखले जात होते. त्यावेळच्या गुलशनाबादमधील एका टेकडीवर हे मंदिर बांधण्यात आले आहे.
फार वर्षांपूर्वी येथे घनदाट जंगल होते. यालाच दंडकारण्य असे म्हणत. पंचवटीतील श्री रामाच्या मंदिरापासून पायी चालताना अवघे १० मिनिटे अंतरावरच श्री तिळा गणपतीचे मंदिर आहे. हे मंदिर गोदावरी नदीच्या अगदी जवळ आहे. मंदिरापासून १५ ते २० मिनिटांच्या अंतरावर तपोवन आहे. याच तपोवनात दर १२ वर्षांनी कुंभमेळा भरतो. त्यामुळे या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागते.
दरवर्षी पौष महिन्यात मकर संक्रांतीनंतर येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला तीळी चतुर्थी म्हणतात. या तीळी चतुर्थीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते. मंदिरात दर्शनाला येणारे भाविक गणपतीला प्रसाद म्हणून तिळाचे लाडू व तिळगूळ वाहतात. नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून या गणेशाकडे बघितले जाते.
संबंधित बातम्या